बहु असोत कणगीभर संपत्ती ही अहा
प्रिय अमुचा खाबुगिरी एक धर्म हा॥
गगनभेदी माया तरी पडते ती उणी
लोभाच्या सीमाही वाढती झणी
चटक एक रे पदाची सोडी ना क्षणी
माल मिळे म्हणूनी मी ही राजकारणी
मंत्र्यासी अटक गमे जेथ दु:सहा ॥ १॥
प्रासाद हा हवा अन हवी स्वमंदीरे
कार्यकर्त्यांची हीच भव्य भांडारे
रस्ता वा चौकासही नाव मम पुरे
"भेट"-गाठ हीच साफल्य-धून ठरे
शुद्ध नसे वर्तनही पण नसे मज तमा॥२॥
जात, धर्म आणि पंथ किती हव्या मिती
'फोडा अन राज्य करा' हीच तर निती
धर्म, न्याय याची नसे कधी अम्हा क्षिती
शक्ती, युक्ती एकवटूनी डाव साधती
पसरे मम भीती अशी विस्मया वहा॥३॥
गीत राजनीतीचे हे श्रवणी, मुखी असो
लक्ष्मी, कीर्ती, सत्ता फक्त स्वजनी ही ठसो
वचनी, लेखनीही स्वजनोद्धार हा दिसो
सतत 'उन्नती' हाच मंत्र अंतरी ठसो
देह पडो, मूर्ती असो ही असे स्पृहा॥४॥
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची मूळ कविता:
बहु असोत सुंदर संपन्न की अहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥
गगनभेदी गिरिवीण अणू नच जिथे उणे
आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवरी जेथिल त्या तुरगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय न दाविणे
पौरूषासी अटक गमे जेथ दु:सहा॥
प्रासाद कशास जेथ हृदय मंदीरे
सद्भावांचीच दिव्य भव्य आगरे
रत्ना वा मौक्तिकाही मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणी खनी ठरे
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा गृहा॥
विक्रम वैराग्य एक जागी नांदती
जरीपटका भगवा झेंडा ही डोलती
धर्मराज कारण समवेत चालती
शक्ती युक्ती एकवटूनी कार्य साधती
पसरे यत्कीर्ती अशी विस्मया वहा॥
गीत मराठ्यांचे हे श्रवणी मुखी असो
स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो
देह पडो तत्कारणी ही असो स्पृहा॥
Monday, April 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
आदिती खुपच छान आहे विडंबन.
खरोखर आज जे घडत आहे याचे चित्रण तु एकदम छान केले आहेस.
apratim!!
अहो,
ही कविता नसून महाराष्ट्र गीत आहे.. आपण कशाला हात घालत आहात याची कल्पना आहे का?
उद्या तुम्ही राष्ट्रगीताचे विडंबन करायला मागे पुढे पाहणार नाही...
देव तुमचे भले करो..
Good parody!
Post a Comment