Thursday, April 7, 2011

अगोरा

अनेक 'यशस्वी' चित्रपट पाहिल्यानंतर काय सापडतं? विशेषतः तो चित्रपट ऐतिहासिक काळातल्या घटनांवर बेतलेला असेल तर? आजही फार काही वेगळं दिसत नाही आणि मुळात मानवी स्वभाव बदलत नाही. भाषा, वेशभूषा, तंत्रज्ञान बदलतं पण स्वभावाला औषध नाही. जमावाला तुच्छतावाद शिकवला की सत्ता हस्तगत करता येते, असलेली सत्ता अबाधित राखता येते. दुसर्‍या जमावाला तुच्छ लेखण्यासाठी भाषा, धर्म, जात, प्रांतिक ओळख किंवा इतर काही मानवनिर्मित ओळख असेल किंवा वंश, लिंग अशी निसर्गनिर्मित असेल. 'अगोरा' हा अलेहांड्रो अमेनाबार या दिग्दर्शकाचा चित्रपट पाहून सर्वप्रथम आठवला तो वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळ्या जमावाप्रती दाखवलेला तुच्छतावाद.

चित्रपट घडतो साधारण इ.स. चौथ्या शतकात इजिप्तमधल्या, अलेक्झांड्रीया शहरात. रोमन साम्राज्याचा अस्त होण्याचा, पेगन पद्धती मागे पडून ख्रिश्चॅनिटीची भरभराट होण्याचा हा काळ! हायपेशिया ही तत्त्ववेत्ती चित्रपटातली प्रमुख व्यक्तीरेखा आहे. पेगन हायपेशिया खगोलशास्त्राची शिक्षिका आहे, तिचे वडील थिऑन हे अलेक्झांड्रीयाच्या पेगन ग्रंथालयाचे प्रमुख आहेत. पेगन आणि ख्रिश्चन समाजातही बुद्धीवादी थिऑन आणि हायपेशिया यांना मान आहे. सुंदर आणि तरूण हायपेशियाला लग्न करण्यात, व्यक्तीगत आयुष्यात फारसा रस नाही. सामाजिक आणि धार्मिक बदल घडत असताना एकीकडे आकाशातल्या ज्योतींबद्दलचे पारंपारिक विचार हायपेशिया तिचे तरूण, उच्चवर्गातील विद्यार्थी, ओरेस्टेस, सायनेसियस आणि तसेच गुलाम दावूस, इत्यादींना शिकवत असते. ओरेस्टेस आणि दावूस या दोघांचंही हायपेशियावर प्रेम असतं. ती, जशी आहे तशी, स्वीकारण्याची ओरेस्टसची तयारी नसते आणि दावूस जसा आहे तसा, स्वीकारण्याची तिची तयारी नसते म्हणून ती तत्त्वज्ञान आणि खगोलशास्त्र यांच्या अभ्यासालाच सर्वस्व समजते. टॉलेमीच्या विचारधारेवर विश्वास ठेवणार्‍या हायपेशियाच्या हार्मनीबद्दल वेगळ्या कल्पना नाहीत, प्राचीन ग्रीकांप्रमाणेच वर्तुळ हाच अचूक आकार आहे, यावर तिचाही विश्वास आहे. पण त्याही बरोबरच नवीन पद्धतीचा विचार विद्यार्थ्यांनी मांडल्यास, त्याचं स्वागत करण्यात तिला कमीपणाही वाटत नाही. आपल्या कामात गर्क असणार्‍या हायपेशिया आणि इतर बुद्धीवादी पेगन लोकांचा सामान्य जनतेशी फारसा संपर्क राहिलेला नाही.

एकीकडे ख्रिश्चन समाजाची वाढत्या ताकदीला सीरिल नामक धर्मगुरू उन्मादाचं रूप देण्यास सुरूवात करतो. त्याच्या नेतृत्त्वाखाली अनेक ठिकाणी ख्रिश्चन समाज पेगन देवतांची विटंबना करण्यात मग्न असतो. दुसर्‍या बाजूने अधिकाधिक लोकांना ख्रिस्ताचा करूणा, प्रेम, दया हा संदेश सांगूनही ख्रिश्चॅनिटीकडे ओढण्याचं कामही सिरील करत असतो. एका बेसावध क्षणी, पेगन धर्मगुरू आणि त्याच्या जोडीला ग्रंथालय प्रमुख, थिऑन, पेगन समाजाला देवतांच्या विटंबनाचा बदला घेण्यासाठी, पेगन समाजाला ख्रिश्चन समाजाविरूद्ध हत्यार उचलण्याची अनुज्ञा देतात. हायपेशियाचा हिंसेला विरोध मान्य करून तिचे अनेक विद्यार्थी या संघर्षापासून लांब रहातात तरीही ओरेस्टस पेगनांच्या बाजूने हत्यार उचलतो. ख्रिश्चनांची वाढती संख्या पाहून पेगन, सेरापियम या त्यांच्या ग्रंथालयाचा आश्रय घेतात. काही दिवसांनी रोमन साम्राज्याकडून पेगन लोकांना माफ केल्याचा हुकूमनामा येतो पण त्यांना त्यांचं ग्रंथालय, ग्रंथांसकट ख्रिश्चनांच्या हवाली करावं लागतं. ग्रंथालय सोडून पळून जाताना, हायपेशिया, थिऑन, ओरेस्टस आणि पेगन विद्यार्थी, जमतील तेवढे ग्रंथ आणि चीजवस्तू वाचवण्याचा प्रयत्न करतात. या गदारोळात हायपेशियाकडून दावूसचा अपमान होतो आणि ती ओरेस्टसच्या मदतीने महत्त्वाचे ग्रंथ घेऊन तिथून निसटते. पेगन विद्यार्थ्यांच्या हिंसेचा बदला सेरापियम नष्ट करून ख्रिश्चन लोक घेतात.

द्रष्ट्या नेतृत्वाच्या अभावामुळे सीरिलला पुढे महत्त्व मिळतं. त्याची भडकाऊ भाषणं आणि वागण्यामुळे बराचसा पेगन समाज ख्रिश्चन होतो आणि ज्यू समाज अलेक्झांड्रीयामधून हद्दपार होतो. सीरिलचा लोकसंग्रह आणि पाठींबा वाढतच जातो. तेवढ्यावरच सीरिल समाधानी नसतो. त्याला अलेक्झांड्रीयाचा सर्वेसर्वा होण्यात, स्वत:चं संपूर्णपणे निरंकुश साम्राज्य निर्माण करण्यातच रस असतो. दावूसबद्दल आपलेपणा वाटणारी हायपेशिया, ग्रंथालयातून निघून जाताना, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करते; ग्रंथ वाचवण्यासाठी, तिचा ओरेस्टसबरोबर जाण्याचा निर्णय संपूर्ण अलेक्झांड्रीयाचं, तिथल्या समाजाचं, कदाचित खगोलविज्ञानाच्या प्रगतीचं आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अस्तित्त्वाचंही भवितव्य ठरवतो का?

हायपेशियाचा रस फक्त खगोलविज्ञान आणि तत्त्वज्ञानात असतो. प्रयोगांची निरीक्षणं आणि त्यातून निघणारी अनुमानं जर टॉलेमी किंवा इतर कोणा ज्ञानी पूर्वसूरींच्या निष्कर्षांच्या विपरीत असतील तरीही त्या अनुमानांवर विश्वास ठेवणार्‍या हायपेशियाबद्दल आदर वाटतो. पण सामाजिक, राजकीय परिस्थितीचा अंदाज नसणारी हायपेशिया व्यक्तिगत निर्णय घेताना, गडबडीच्या क्षणी गुलामाला त्याच्या गुलाम असण्याची जाणीव करून देताना सामान्य वाटते; कदाचित आपल्या एका निर्णयामुळे सीरिलसारखा हिंसक, अविचारी धर्मगुरू जिंकला ही पराभवाची जाणीव तिला बरीच उशीरा होते.

असामान्य बुद्धीमत्तेचा लोकसंग्रहाशिवाय उपयोग होत नाही; समाजापासून बुद्धीवादी फटकून वागले, आपल्याच हस्तिदंती मनोर्‍यात ग्रह-तार्‍यांमधेच रममाण राहिले म्हणून सीरिलसारखा, लोकांना अज्ञानात ठेवणारा लोकसंग्रह करू शकला आणि त्या जोरावर ठोकशाही मार्गाने सत्ता हस्तगत करू शकला. चौथ्या शतकात (म्हणे) हायपेशियाला ग्रहांच्या दीर्घवर्तुळाकार कक्षांचा शोध लागला. दीर्घवर्तुळातली हार्मनीही* तिने शोधून काढली. पण गॅलिलेओपर्यंत भूकेंद्री विश्वाची संकल्पना सर्वत्र मान्य होती. १७ व्या शतकातल्या योहान्नेस केप्लरपर्यंत ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार असल्याचा समज होता. एक हजार वर्षांच्या अंधारयुगात वैज्ञानिक विचार आणि दृष्टीकोन मागे पडला, धर्मसत्तेचं समाजावर प्राबल्य राहिलं आणि उरला तो वेगवेगळ्या प्रकारचा तुच्छतावाद. आजही एकविसाव्या शतकात धर्म, भाषा, जातींच्या आधारावर हिंसा होते आणि त्याला समाजाच्या काही गटांमधून का होईना, पाठिंबा मिळतोच.

*दीर्घवर्तुळाच्या (ellipse) परीघावरील कोणत्याही बिंदूच्या दोन्ही नाभींपासूनच्या (foci) अंतराची बेरीज समान असते.

हा लेख इथेही प्रसिद्ध केला आहे, त्यावरचा हा प्रतिसाद वाचनीय आहे.

Followers