Saturday, January 23, 2010

दहा वर्ष

दार उघडून शरयू आत शिरली. आज तिलाच दार बंद करायचं होतं. समोरच्या घरातल्या काकूंची चाहूल लागली तसे तिने डोळे कोरडे केले, पण घाईघाईत दार लावून घेतलं. आत्तातरी कोणाशीही बोलावं असं तिला वाटत नव्हतं. पहिल्यांदा ती जेव्हा एकटीच घरी आली होती ...

आज पहिल्यांदाच ती या घरात एकटी शिरत होती. लग्नाआधी किती दिवस, आठवडे, महिने ती घरी एकटी रहायची पण कधीच त्याचं काही वाटलं नव्हतं. पण लग्नानंतर या घरात आली आणि निस्सीमशिवाय घरात कधी शिरली असं झालंच नाही. लिफ्टमधे असतानाच किल्ल्या काढून ठेवायची तिची सवय, त्यामुळे दार तिने उघडायचं आणि त्याने मागून आत शिरून दार लावायचं. तिने एक क्षण थांबून विचार केला, तिला आठवलंच नाही तिने कधी आतून दार लावून घेतलं नव्हतंच.

संध्याकाळी साडेचारला ऑफिसच्या मित्र-मैत्रीणींबरोबर ती चहा प्यायला जायची, तेव्हाच निस्सीमचा फोन आला. "शरू, मिलींदचा शेवटचा आठवडा आहे इथला. आज संध्याकाळी सगळे मित्र/कलीग्ज बाहेर जाणार आहेत जेवायला..." पुढचं काहीही न ऐकता ती म्हणाली, "मग तू पण जा. आणि एक काम कर, ऑफिसच्या शेजारी केकचं दुकान आहे, तिथून त्याच्यासाठी काहीतरी घेऊन या. नाहीतर तुम्ही पोरं असं काही करणार नाही." "तुला कसं कळतं गं मला काय म्हणायचं आहे ते?" "..... कळतं. माझ्या जेवणाची काळजी नको करूस."

घरी एकटीच स्कूटरवरून जाताना तिला काहीतरी विचित्रच वाटलं. दार स्वतःच बंद केलं तेव्हा डोळ्यांत पाणी आलं होतंच, पण ती स्वतःच हसली. "दोन-चार तासातच येईल तो परत! एवढं काय त्याचं?" आणि तसंच झालं, तिचं जेवण होतंय ना होतंय तोच फोन वाजला. "आत्ताच मिलिंदनी मला गेटपर्यंत सोडलं, आता दोन मिनीटात पोहोचतोच आहे मी घरात!" निस्सीमला बेल वाजवायची गरज पडलीच नाही. "मिलींद म्हणत होता, "आत्ताच तर तुमचं लग्नं होतंय, वर्ष पूर्ण होऊ देत मग काय ती तुझ्या फोनची वाट पहात बसणार नाही.", निस्सीम न विचारताच सांगत होता. ""आमचं लग्नं होऊन दीड वर्ष उलटून गेलंय .... " मग काही बोलला नाही तो." दोघंही हसले आणि शरयूने त्याला संध्याकाळी डोळ्यात पाणी येण्याबद्दल सांगितलं. निस्सीम तिच्याकडे पाहून फक्त हसला आणि तिला जवळ घेतलं.

शरयू पुन्हा वर्तमानात आली, पुन्हा डोळ्यांचा कडा ओल्या झाल्या. आत्ताच ती विमानतळावरून परत येत होती. आता पंधरा दिवस एकटीनेच रहायचं ... आणि तिला अचानक काही आठवलं. आई गेली तेव्हा ती स्वतःशीच विचार करत होती, "मलाच का हे सगळं सहन करावं लागतं?" रात्री सामसूम झाल्यावर हा विचार करताना ती कित्येकदा ओल्या उशीवरच झोपली होती. आता मात्र तिला आईबद्दल खूप वाईट वाटलं "... ती तर दहा वर्ष राहिली, फक्त माझ्यासाठी .... "

आठवणी

आंतरजालावर आणि लेखी साहित्यातही अनेक लोकं आपल्या बालपणात रमलेले दिसले. ते वाचलं आणि वाटलं "मला लहानपणाची आठवण अशा पद्धतीने होत नाही." ... मला आठवते एक शेंबडी, रडूबाई, जिला सगळे काकू म्हणायचे आणि ती त्यावर चिडायची. आजची मी आणि तेव्हाची मी ... वेगळीच माणसं आहेत का काय एवढा संशय येण्याएवढी मी बदलले.

मला आठवतंय माझी पहिली ते चौथीतली मैत्रिण पुढे मला कधीच भेटणार नव्हती, म्हणून मी रडले होते. पण आता मला तिचा चेहेराही आठवत नाही. पाचवीत मी शाळा बदलली. तिथे मराठी शिकवणार्‍या एक बाई म्हणायच्या, "मला माझ्या आई-वडीलांची आठवण झाली की मी माझ्या शाळेत जाते. तिकडे गेलं की कोणी डोक्यावर हात ठेवणारं कोणी वडीलधारं असल्यासारखं वाटतं." शाळेत शिकत असताना मला ते कधी पटलं नाही, पण तेव्हा असं बोलता येतं हे माहितच नव्हतं. आणि आता मी "कुठे उगाच त्यांच्या या वयात त्यांच्या भावनांशी विरोध दर्शवून वाद उकरून घ्या" या विचाराने बोलत नाही. कृती तीच आहे पण तरीही ते करणारी मी फार बदलले आहे. आणि हा बदल झाला याचा मला आनंद आहे.

मला शाळेत जावं असं काही मनापासून वाटत नाही. कधीमधी ठाण्याला गेले, शाळेच्या वेळात त्या बाजूला गेले, घरी कोणी जेवणासाठी वाट पहात नसेल तरच मी शाळेत आत जाते. "ही माझी शाळा" असं काही उचंबळून वगैरे येत नाही. शिक्षकांच्या खोलीत खूपच कमी ओळखीचे चेहेरे असतात. त्यातल्या काही चेहेर्‍यांवर "अरेच्चा, ही एवढी कशी काय शिकली", हे अगदी व्यवस्थित दिसतं. उरलेले चेहेरे खूप सुरकुतलेले असतात, आणि त्या सुरकुत्यांमधून अभिमान आणि प्रेम दिसतं, तेवढंच घेऊन मी बाहेर पडते. पण तरीही ही शाळा 'आपली' वाटत नाही, कारण तहान लागलेली असली तर पाणेर्‍यावरची घाण पाहून तिकडे पाणी पिववत नाही. उगाच नाही आई रोज पाण्याची बाटली द्यायची असा विचार डोक्यात येतो. आणि शी! अजून हे संडास असेच घाणेरडे, इथे आपण कधी(तरीच) जायचो या विचाराने अजूनही किळस येते. या शाळेबद्दल मी अभिमान बाळगावा असं अनेकांना वाटतं, पण म्हणजे काय हे मला अजूनही समजत नाही. या शाळेत अनेक शिक्षक भेटले, ज्यांच्याकडे पाहून इतरांनी समजून घ्यावं, वाईट शिक्षक असेच असतात. पण एक खूप चांगली मैत्रिण मात्र याच शाळेत मिळाली. तिची अधूनमधून आठवण आली की तिला इमेल करायचं, तिचा प्रतिसाद येतो त्याच आठवड्यात, तो वाचून आताच्या मित्रांबरोबर चहाला जायचं.

लहानपणी मी बिल्डींगमधेही खूप दंगा केला, पण तेव्हाही मी रडूबाईच होते. तेव्हाचे बरेचसे मित्र माझ्याप्रमाणेच आधी शिक्षण आणि आता नोकरीच्या निमित्ताने तिथे नाहीत. मीही क्वचितच परत जाते, वर्षातून दोनदा भेटलो तरी खूप! भेटलो की गप्पा रंगतात, आवडीनिवडीप्रमाणे चहा, सरबत, भेळ, वडे हादडतो, पण कधीच (कोणालाही) ते दिवस गेल्याचं वाईट वाटलेलं दिसत नाही. थोडंफार दु:ख होतं ते एक नारळ, एक बकुळीचं झाड आणि इतर बरीच झुडपं बिल्डींग पुन्हा बांधली त्यात गेल्याचं!

हो, ती बिल्डींगही पुन्हा बांधली गेली. आमच्या तळमजल्याच्या चार घरांमधे एवढ्या वेळा पावसाचं पाणी घुसायचं की आम्ही चार घरं तर अगदी आनंदात होतो, पण इतरही अनेकांना बिल्डींग पुन्हा बांधायला पाहिजे याची जाणीव होती. जुन्या घराचे असे दुर्दैवी दशावतार पाहून मला आणि भावाला दु:ख व्हायचंच, पण त्याही पेक्षा जास्त आनंद झाला आता कोरंकरकरीत घर मिळणार याचा! भाऊ आणि वहिनीने आत्ता घर जे काही मस्त रंगवलं आहे, नवीन फर्निचर केलं आहे ते पाहून तर मला आणखीनच जास्त आनंद होतो. पण शिक्षणाच्या निमित्ताने अनेक वर्षांपूर्वीच घर सोडलं, मधल्या काळात 'घर' नक्की कुठे आहे हाही प्रश्न पडला होता. पण आता मात्र कन्सेप्ट्स क्लियर आहेत. मी जिथे रहाते तेच माझं 'घर' आहे. सध्या नाईलाजास्तव माझी दोन घरं आहेत, पण ती माझी आहेत. नवीन बांधलेल्या इमारतीत माझा मालकी हक्क असला तरी ते घर माझं नाही, भाऊ-वहिनीचं आहे याची व्यवस्थित जाणीवही आहे. माझं लहानपण अजूनही मला आठवतं, अनेक सुखद आणि दु:खद गोष्टी अगदी अलिकडे घडल्या आहेत अशा लक्षात आहेत. पण ते लहानपण गेलं याचं दु:खही नाही आणि आनंदही नाही.

शिक्षणासाठी घराबाहेर पडले तेव्हा परदेशात दुसरं घर बनलं. तिथले मित्र सगेसोयरे बनले. त्यातल्या एकाचा, माईकचा, एक मित्र बर्‍याचदा या घरी शनिवार-रविवारी यायचा. पण हाच माईक अनेकदा असंही म्हणायचा, "पूर्वीच्या मित्रांशी माझा फारसा संबंध नाही, आणि इथून आपण बाहेर पडलो की तुमच्याशीही माझा फार संबंध राहिलंच असंही नाही". तेव्हा त्याचं बोलणं क्रूरपणाचं वाटायचं. पण अचानक एका मैत्रिणीचं इमेल आलं, तिने तिचा थिसीस सबमीट केल्याचं, आणि लक्षात आलं, गेल्या चार महिन्यात या कोणाशीही आपला काहीही संबंध नव्हता. संध्याकाळीच दोघांशी स्काईपवरून बोलले आणि छान वाटलं. पण मँचेस्टर विमानतळावर, आता माहेर संपलं, अशा आविर्भावात मी रडले होते त्याच्या एक टक्काही वाईट वाटलं नाही. दीडेक वर्षांनंतर माईकचं इमेल आलं, तो भारतात येणार होता तेव्हा मात्र खूपच आनंद झाला. कॉन्फरन्स संपल्यावर मुद्दाम पाच दिवस सुट्टी काढून तो राहिला होता, आग्रहाने मला पावभाजी बनवायला सांगितली आणि माईक तेव्हा वाटला होता तसा अजिबात क्रूर नाही याची जाणीव झाली.

गेल्या वर्षाच्या शेवटी एक मित्र, एक मैत्रीण ही संस्था सोडून पुढच्या प्रवासासाठी देशाबाहेर गेले. आठवडा-दहा दिवस त्यांची कमतरता भासली, पण आहे त्यात जुळवून घेतलं. अजूनही आठवण झाली की आम्ही स्काईपवर गप्पा मारतो, जसे काही पूर्वीसारख्याच माझ्या घरात बसून कॉफी पित टवाळक्या सुरू आहेत. छान वाटतं.

पण अजूनही जुने मित्रमैत्रिणी जवळ नाहीत याचं दु:ख असं होत नाही. कदाचित पृथ्वी गोल असल्याचं अनेकदा दिसलं आहे म्हणून असेल, कदाचित कुठेही गेले तरी भेटणार्‍या त्याच आणि तशाच प्रकारच्या माणसांमुळे असेल. ही नवीन माणसं भेटतात आणि संगत सुटते तेव्हा एक मैत्र जुळलेलं असतं. लिहायला सुरूवात केली तेव्हा वाटत होतं की मला बालपण संपल्याचं दु:ख होत नाही याबद्दल लिहेन. पण आता लिहीत गेल्यावर असं वाटतंय, मला नेहेमीच खूप चांगले मित्र-मैत्रिणी मिळाले याचं खूप समाधान वाटतंय. त्याच सगळ्या मित्र-मैत्रिणींना हा लेख अर्पण!

Followers