Friday, July 10, 2009

तुमचा खेळ होतो आणि आमचा ... (भाग एक)

निलेश, असाच एक सॉफ्टवेअर इंजिनियर, एका प्रथितयश सॉफ्टवेअर कंपनीमधे नुकताच नोकरीला लागला होता. इंजिनीयरींग कॉलेजमधे नेहेमीच पहिल्या तीनात आल्यावर नोकरी मिळवण्यासाठी फार काही कष्ट करावे लागलेच नाहीत. परिक्षेतल्या मार्कांसाठी अभ्यास करता येत असला तरी वर्षातले परीक्षा, सबमिशन असे तीन-चार महिने सोडले तर हा कायम काही ना काही 'प्रोजेक्ट्स' करत रहायचा! आई मात्र "पोरगा का कायम कंप्यूटरला चिकटून बसलेला असतो" या चिंतेत असायची. घरी मित्रमंडळ आलं तरी चर्चा कायम अगम्य भाषेतच! आईला त्यांची भाषा इंग्लिश, मराठी किंवा हिंदी आहे ते समजायचं पण काय बोलायचे ते कधीच तिच्या पचनी पडलं नाही. पण पोरगं कधी वाईट नादाला लागणार नाही याची खात्री होती आणि परीक्षेतल्या मार्कांवरून त्याची पावतीही तिला मिळायची त्यामुळे तिने कधीच फार चौकशी केली नाही. घरात आणि नातेवाईकांमधे शांत असणारा निलेश, त्याचं मित्रमंडळ आला की मात्र पार बदलून जायचा. उत्साहात काहीतरी चर्चा घडत, दोन मित्र, श्रीराम आणि हृषि, कधीमधी रात्री घरी थांबत आणि आईशीही मस्त गप्पा मारत, एकीकडे काहीबाही कामही सुरू असायचं. त्यांच्या कामातलं काही समजत नसलं तरी पोरांसाठी रात्री कॉफी बनवून देताना, त्यांना रात्री दोन वाजताही काही खायला बनवून देताना आईलाही मनापासून समाधान मिळत असे. आणि एका रात्री निलेशने आईला उठवलं, कंप्यूटरवर तिघांनी मिळून पृथ्वीवरचे ऋतू, चंद्र-सूर्याची ग्रहणं, पृथ्वीची परांचन गती समजावून सांगणारं सिम्युलेशन तयार केलं होतं. पोरांचं रात्री उशीरा जागून काय चालायचं हे आता मात्र आईला व्यवस्थित समजलं.

निलेशला ज्या कंपनीत नोकरी लागली तिथेच श्रीरामलाही मिळाली. पण त्याने आणि हृषीने एकत्र धंदा सुरू करायचं ठरवलं, आय.टी.संदर्भातलाच. निलेशच्या घरची आर्थिक परिस्थिती त्याच्या वडिलांच्या पाठून थोडी खराब झाली होती त्यामुळे त्याने एकीकडे नोकरी सुरू करत दुसरीकडे मित्रांना लागेल तशी मदत करायचं ठरवलं. नव्या नोकरीत रूळायला निलेशला अजिबातच वेळ लागला नाही. ज्या लोकांनी लिहिलेली पुस्तकं तो अभ्यासक्रमात वाचत होता तीच माणसं आता त्या कंपनीत त्याचे सिनीयर्स, बॉस म्हणून नोकरीला होती. मनासारखं काम करायला मिळत होतं, चर्चा करायला एकापेक्षा एक हुशार माणसं आजूबाजूला होती, अननुभवी मुलासाठी पगारही चांगला होता, शिवाय शनिवार-रविवार हृषी आणि श्रीरामबरोबरही काम सुरू होतं. हल्ली आई मागे लागल्यामुळे तो रोज सकाळी उठून ऑफिसच्या जिममधेही जात होता.
आणि हो, ऑफिसमधेच निलेशच्याच मागोमाग एक मुलगी जॉइन झाली होती. कुठल्या डिपार्टमेंटला होती, तिचं नाव काय, निलेशला माहित नव्हतं. पण तीसुद्धा रोज सकाळी याच्याच वेळेला जिममधे असायची. तीही एकटीच असायची आणि हा पण, हळूहळू दोघांना एकमेकांची नावंतरी समजली. काही दिवसातच त्याला समजलं की नंदिनी सायकोलॉजिस्ट आहे आणि ट्रेनी म्हणून ती सध्या त्याच्याच कंपनीत लागली आहे. अतिकामाच्या ताणामुळे कर्मचार्‍यांना होणारे मानसिक आजार टाळण्यासाठी चांगल्या कंपन्या सायकोलॉजिस्टनाही कामावर ठेवतात. पण निलेशचा एक प्रॉब्लेमच होता, सख्खी किंवा जवळची बहिण नसल्यामुळे आणि आजपर्यंत कधी मैत्रिणी नसल्यामुळे मुलींशी नक्की काय बोलायचं हे याला माहितच नव्हतं. तो कायमच तिला तिच्या कामाबद्दल, सायकोलॉजीबद्दल प्रश्न विचारत असे आणि ती पण त्याला प्रश्नांची उत्तरं देत असे. तिच्या कामाच्या स्वरुपामुळे तिला याच्याबद्दल माहिती सरळच कळली आणि एवढ्या हुशार आणि सरळ मुलाशी आपल्याला इतक्या सहजच बोलता येत आहे याची तिलाही गंमत वाटत होती. चांगलं आयुष्य यापेक्षा वेगळं असूच शकत नाही यावर त्याचा ठाम विश्वास बसला होता.

पण मंदीचा फेरा कुणासाठीही थांबणार्‍यातला नव्हता. खर्चात कपात निलेशच्या कंपनीतही सुरू झाली होती. प्लास्टीकच्या वापरून फेकून देणाच्या कपांच्या जागी खरे, चिनीमातीचे कप आले होते. ऑफिसमधे कामाचे तास निश्चित केले होतेच, पण त्यापेक्षा जास्त वेळ थांबायला मनाई होती. शिवाय कामाच्या तासांमधे काय काय काम केलं हे दर शुक्रवारी लिहून द्यायला लागत होतं. चांगली गोष्ट एवढीच होती की काम मात्र खूपच रोचक होतं, डोक्याला चालना देणारं होतं. आणि ही नोकरी सोडायची तर पैशांची दुसरी सोयही होत नव्हती. नुकताच बाळसं धरू लागणारा श्रीराम आणि हृषीचा धंदाही जरा खंगल्यागत होत होता. त्या दोघांच्या पोटापाण्याची चिंता नव्हती एवढंच! आता मात्र या त्रिकूटाला पुन्हा आपले कॉलेजचे दिवस आठवू लागले. पुन्हा काहीतरी नवं प्रोजेक्ट मजेखातर करावं, त्यातून पैसे मिळाले तर ठीक नाहीतर अनुभवतरी मिळेल, असं त्यांच्या डोक्यात येऊ लागलं.

निलेशच्या कंपनीत मोबाईल्ससाठी गेम्स बनवत असत. श्रीराम आणि हृषी त्यावरून कायमच त्याची फिरकी घेत, पण या गेम्सच्या क्षेत्रात पैसा चिक्कार आहे आणि तेवढंच आव्हानात्मक काम करता येईल याची त्या तिघांना खात्री होती. कंपनीच्या पॉलिसीजमुळे काय प्रकारच्या गेमवर काम सुरू आहे हे सांगता येत नव्हतं, पण काय प्रकारचा गेम बनवावा हे या तिघांच्या डोक्यात येतही नव्हतं. जोपर्यंत चांगली कल्पना येत नाही आहे तोपर्यंत काही काम सुरू करता येत नव्हतं. पुन्हा एका शनिवारच्या पावसाळी रात्री तिघे जण निलेशच्या घरी बसले होते. गंमतीत एक फेरी मारून आल्यावर तिघेही भिजले. कपडे बदलून आल्यावर मग कॉफीची लहर आली. "काकूला उठवण्याऐवजी आज मीच कॉफी बनवतो", हृषी उठला. थोडं दूध आणि थोडी साखर 'ओटा'तीर्थी पडल्यावर कॉफी कपांमधे आली. गरमगरम कॉफी पोटात गेल्यावर मात्र तिघांनी झोपायचं ठरवलं. टी-पॉयवर तसेच कॉफीचे कप, सारखेचे दाणे, टाकून तिघंही डाराडूर झोपले आणि सकाळी आईने पोहे फोडाणीला टाकल्यावरच हाक मारली. आळोखेपिळोखे देत असताना श्रीरामला कालच्या टीपॉयवर माशा दिसल्या. त्याने हातात 'टाईम्स' घेऊन माशांवर एक हल्ला चढवला. माशी उडून गेली. मग निलेशला 'सकाळ' दिसला, आणि एक टार्गेट माशीही सापडली. इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि माशी उडून गेली. हृषी मात्र या कडे टक लावून पहात होता. "ए हृष्या, उठ की आता जागा हो जरा, किती वेळ असा मंदसारखा बघत रहाणार आहेस?"

हृषीने शांतपणे आपलं निरीक्षण सुरूच ठेवलं आणि हळूच म्हणाला, "सध्या सुरूवातीला हाच खेळ कंप्यूटरसाठी लिहिला तर?"

गोष्टीसाठी काही सत्य घटना, काही चित्रपटांच्या कथांचा काही भाग आणि माझी कल्पना यांची मिसळ केली आहे. याउप्पर कोणत्याही प्रकारचं प्रकाशित साहित्य कच्चा माल म्हणून वापरल्याचं लेखिकेच्या आठवणीत नाही.

पुढचा भाग पुढची सी.एल. घेईन तेव्हा!

No comments:

Followers