Wednesday, April 22, 2009

भीषण सुंदर

कधी कधी एखादी गोष्ट डोक्यात पक्की बसून रहाते. ती खूप छान, सुंदर, अप्रतिम, या आणि तत्सम विशेषणांनी गौरवावी अशी असतेच असं नाही. कधीतरी असं वाटतं की ही फलाणी गोष्ट इतकी भुक्कड आहे की ते वाचून, पाहून, ऐकून हसू दाबता येत नाही आणि हे हास्य पसरवण्यासाठीही त्या टुकार गोष्टीला आपणच प्रसिद्धी द्यावी असं वाटतं. बर्‍याच दिवसांपासून डोक्यात एक नाच-गाणं आहे, अर्थातच हिंदी सिनेमातलं.इथे पहा ते! http://www.youtube.com/watch?v=sotm1QDsuV0&feature=related

आता सुरूवार करू या सुरूवातीपासूनच! तर सुरूवातील विजा चमकतात, पार्श्वभूमीवर एक बाई भेसूर हसते ज्यावर आपल्याला ना हसायला येतं ना रडायला! आणि मग दिसतो हा आपला हॅण्डसम हंक! कोण रे ते कोपर्‍यातून 'हा हंत, हा हंत' म्हणत आहे? त्याच्याकडे मी साफ दुर्लक्ष केलं आहे. तुम्ही पोरं राखी सावंत, मल्लिका शेरावत वगैरे ओंगळ बायकांना "सुंदर" म्हणता तेव्हा मी काही बोलते का? मग मी या बाब्याला, काय बरं याचं नाव... जे काय असेल ते, मी याला ठोंब्या म्हणणार. ठोंब्या हे माझं आवडत्या नावांपैंकी एक, मी लहान असताना आई मला ठोंबीच म्हणायची (वुडवर्ड्स ग्राईप वॉटरची जाहिरात आठवली का नाही?). तर हा, तर हा आपला हॅण्डसम हंक, ठोंब्या, हातात फूल ना फुलांचा गुच्छ घेऊन सुरूवात करतो, नाचायला हो! तुम्हीकाय समजलात, गाणं म्हणायला? नाही, ते ही करतो तो, पण थोडं उशीरा. आता या प्राण्याला हीरो का म्हणायचं? कारण हिंदी पिच्चरमधे नाच गाणं फक्त हीरोलाच असतं नाहीतर साईड हीरोला. पण ठोंब्या किनई एवढा सुंदर आहे की त्याला साईड हीरो कसं म्हणणार? शिवाय हिंदी पिच्चरमधे आख्खं गाणं फक्त साईड हीरो किंवा साईड हिरविणीवर 'वाया' घालवतात का? तर त्यामुळे आमचा सुंदर ठोंब्या या पिच्चरचा हीरोच आहे. आता या पिच्चरचं नावबिव आठवत नाही. पण नक्की घरी पाहिला असणार हासुद्धा पिच्चर!

मी बारावीत असताना घरी केबल घेतली. दुपारी मी आणि बाबा जेवायला बसायचो तेव्हाच फक्त टी.व्ही. पहायचो. कामांची विभागणी ठरलेली होती, म्हणजे बरीचशी कामं बाबाच करायचे. जेवण गरम करणे, माझी वाट बघणे, मी घरी येऊन, हात-पाय धुतले आणि बसले तशीच की एकदा मला 'कपडे बदलून घे' असा प्रेमळ, खरंच प्रेमळ हो, सल्ला देणे, मी कपडे बदलताना जेवण वाढणे, अशी सगळी कामं बाबा करायचे. मग मी ताटं घेऊन बाहेर आणायचे आणि आम्ही दोघे जमिनीवर स्थानापन्न व्हायचो. मग न चुकता आम्हाला आठवण व्हायची की टी.व्ही. बंद आहे, आणि रिमोट टी.व्ही. जवळच आहे. हे काम मात्र मीच करायचे, उठून मुख्य बटन लावणे आणि रिमोट बाबांच्या हातात देणे. ते अगदी प्रेमाने ही रिमोटचीही जबाबदारी घ्यायचे, पण नियम एकच, जो चॅनल सुरू असेल तो बदलायचा नाही. बर्‍याचदा रात्री जेवताना केबलचा चॅनल गाण्यांसाठी मीच पहायचे, तेव्हा तोच असायचा. आणि तिथे असे एकेक "उत्तम, उदात्त, उन्नत" पिच्चर असायचे. तो पर्यंत आमची पांढरू यायचीच तिथे! पांढरू म्हणजे आमची मांजर. तिच्याबद्दल एक स्वतंत्र लेखच लिहीला पाहिजे तेव्हा इथे लिहित नाही. पण मुद्दा असा की ती कुठेही असली तरी टी.व्ही. सुरू झाला की लगेच यायची ... माझ्या रक्षणाकरता! कारण आमचे हीरो, म्हणजे बाबा हो, चॅनल बदलू द्यायचे नाहीत. केबलवर असे महानआणि हुच्च पिच्चर सुरू असायचे आणि बाबांना त्याचा काही फरक पडायचा नाही. ते तल्लीन होऊन जेवायचे आणि दुसरीकडे मटातला अग्रलेख उघडायचे. तो झाला की इंडीयन एक्सप्रेसच्या अग्रलेखाचा नंबर लागायचा. तोपर्यंत भूक जागृत झालेली असायची त्यामुळे मी कधीच उठून टी.व्ही. बदलायचे कष्ट घ्यायचे नाही. शिवाय पांढरू आली की बाकीच्या जगाकडे कोण लक्ष देणार? एकतर प्रत्येक घास किमान ६४ वेळा चावला का नाही याची गणती करायची, पांढरूला पोळी बळेबळे भरवायची, ती पाठीला पाठ घासायला लागली की तिला धक्का द्यायचा असे खेळ चालायचे. मग टी.व्ही. बॅकग्राऊंडला सुरू आणि आम्ही दोघं आपापल्या विश्वात रमून जेवायचो. तर मुद्दा (मी विसरले नाही आहे मुख्य विषय काय आहे ते!) असा की टी.व्ही. मधूनच पहायचा, एखादा खडा आला चुकून, किंवा तिखट लागलं तर विश्वातून बाहेर यायला लागायचं तेवढाच. तर मी तेव्हा नक्की हा पिच्चर पाहिला असणार. पण तेव्हा मला आजच्याएवढी (तरी) सौंदर्यदृष्टी नसल्यामुळे मी तेव्हा या पिच्चरकडे आणि मुख्य म्हणजे ठोंब्याकडे दुर्लक्ष केलं असणार. असो.

तर ... मी असं म्हणत होते, की सुरूवातीला वीजा चमकल्यावर हा ठोंब्या अचानक दिसतो एका बागेत आणि गंमत म्हणजे हवा एकदम मस्त! अहो, क्षणाक्षणाला बदलणार्‍या हवेसाठी प्रसिद्ध असणार्‍या सायबाच्या देशातही एवढ्या चटकन हवा बदलत नाही. अर्थात पापणी लवायच्या आत मुंबैहून मिलानला जाणार्‍या लोकांसाठी हवा बदलणं म्हणजे नक्कीच 'किस झाड की पत्ती' असणार! तर तिथे दिसतो आपला ठोंब्या, एका बागेत, एका फोटोबरोबर, त्याच्या
बर्‍यापैकी किंचितशा सुटलेल्या ढेरीपोटासकट! आणि मग गाणंही सुरू होतं, "जब से हुई है मुहोब्बत, तब से हुई ..." नाही, माझं गाण्याच्या बोलांकडे लक्षच गेलं नाही. माझं सगळं लक्ष होतं ठोंब्याकडे! काय सुंदर नाच बसवला आहे या गाण्यावर! मला एकदम आमच्या शाळेच्या गॅदरिंगची आठवण झाली. एका वर्षी वानखेडे (का वानरवेडे?) सरांनी एक "डॅन्स" बसवला होता त्याची; गाणं होतं,
हिवर पिवर पिवर पी हिवर पिवर पिवर पी।
पायात पैंजण मी घातलेले, जशी पायमोडी, पायमोडी करणारी ।
असं काहीसं! मी एकदम माझ्या बालपणाच्या 'रम्य' शालेय आठवणीत बुडून गेले. पोहोता येत नाही आठवल्यावर त्या आठवणींतून सरळ पुन्हा गाणं पहायला लागले. तर हा भाई एकदम गडाबडा लोळायला लागला, उठाबशा काय काढायला लागला, गोलगोल काय फिरायला लागला, 'बार' डान्स काय करायला लागला, आहाहा... आणि मग आली एक बया, केशरी ड्रेसवाली, मी तिच्याकडे फारसं पाहिलं नाही. त्या दोघांनी काही नाचायचा प्रयत्न केला.

आता मात्र हसू असह्य झालं; ऑफिसमेट उठून माझ्या डेस्कपाशी आला. मी हेडफोन काढले आणि त्याने लगेच कानावर चढवले. गाणं आणि 'नाच' संपूर्ण पाहूनच त्या स्थितप्रज्ञ माणसाने शांतपणे हेडफोन काढले आणि म्हणाला, "कल के लंच मे मराठी मेन्यू है, तुम्हारा चॉईस क्या है, अळूकी भाजी का मेथी-दाल?"

आता अगदीच भंकसः

एवढं सगळं इथे लिहिताना माझ्या डोक्यात आणखी एक विचार येऊन गेला, आत्तापर्यंत कधीच माझा पहिला नंबर आला नाही, अगदी कुठ्ठे नाही. तेव्हा या भयंकर सुंदर व्हीडीओबद्दल ब्लॉगपोस्ट लिहिणारी मी पहिलीच नसणार. शोधून पहायला पाहिजे!

मला हा व्हीडीओ अनेकांना दाखवायचा आहे. एका वेळेला सगळी नावं आठवतील असं नाही. शिवाय काम करून खूप कंटाळा आला तर हा व्हीडीओ फार मोठी करमणूकही करेल. तर बुकमार्क टाकण्यापेक्षा एक ब्लॉग लिहून ठेवलेला काय वाईट? दिसामाजी काहीतरी(च) ते लिहावे।

11 comments:

मी बिपिन. said...

I am dying to see that video now!!!

nana said...

आजच दुपारी अदितीदेवींच्या कृपेने हा व्हिडिओ पाहिला.
त्यावरचा हा लेख मस्तच आहे.

अदितीदेवीं लिहित रहा

छोटा डॉन said...

हा हा हा, मस्त पोस्ट आहे ...
वापरलेल्या विवीध उपमा आवडल्या, ठोंब्या ही खुप वेळा कानी पडल्याने जास्त जवळची वाटली ...
असो.

व्हिडीओ लैच जबरा आहे पण त्यावर लेख लिहता येईल असे नव्हते वाटले ;)
छान जमला आहे लेख, असेच लिहीत रहा ...

आणि हो, "पांढरु" वरच्या लेखाची वाट पहातो आहे ...

Nandan said...

Lekh aavaDla. Mazya orkut varchya videos madhe ya video la kahi divasanpoorvich aDhaLpad miLale :). It-is-so-bad-that-it-is-actually-good category (kinva ati zala aaNi hasu aala) madhe fitt basaNara ha video. Baki Donyashi sahmat aahe (ekade paN sahmatichi savay jaat nahi :)), paanDharubaddal lihi kadhitari.

PrAsI said...

http://www.youtube.com/watch?v=LbvP7dT3Dx0

आम्ही प्रतिसाद म्हणुन फक्त वरील व्हिडीओ लिंक देउ शकतो.

sanhitamj said...

बिपिन, नाना, छोटा डॉन, नंदन, प्रसाद, आभार.
नंदन, wise people think alike (wpta) and fools seldom differ! मलाही हा व्हीडीओ एवढा 'आवडला' की मीसुद्धा याला अढळपद देण्याचं ठरवलं. 'पांढरू'बद्दल नक्कीच लिहेन मी.

संतापक said...

कुठून असले व्हिडिओ शोधता बॉ तुम्ही? त्या पांढरूवर लिहायचं बघा जरा. दिसामाजी काहीतरी(च)असं म्हणण्याची वेळ नाही यायची. कसे?

Ruyam said...

good!!
kiti wel hasalo hoto ha video baghun..
pan tywar blog asel asa watla navhta ekhaadaa... :)

Parag said...

Instead of thombya call him "Pappu". Remember Pappu can't dance sala. :D

दिपक said...

बेक्कार व्हिडियो आणि खत्तरनाक परिक्षण.. व्हिडियो मागेच पाहिला तेव्हा हसुन जाम हालत झाली होती... आणि इथे जे लिहिलेय ते धम्माल... :D

Deep said...

VaaaiTT video aahe tyapeksha tuza lekh donda vachen LOL

ha bgh ha hi ek bhaaree aahe
PS sound mute karunch video paha!!

hyavar hi ek mahan lekh lihta yeil pan te mi sadhy taaltoy.

gan hai -Hai Re Hai Neend Nahin Aay

http://www.youtube.com/watch?v=18yotsvHrWU

Followers