"तुझा देवावर विश्वास नाही हे बरोबर नाही!", "तू मंगळसूत्रसुद्धा का घालत नाहीस?", "तू तरी त्याला सांग जरा मोठ्या माणसांचं ऐकायला!" अशी वाक्य अगदी रोज कानावर आली नाहीत तरी क्वचितच कानावर येतात असंही नाही. दोन्ही बाजूंच्या व्यक्ती बदलतात पण प्रवृत्ती एकच असते; 'जे वर्षानुवर्ष चालत आलं आहे तेच बरोबर आहे', या तत्त्वावर गाढ आणि आंधळा विश्वास असणे! आणि या प्रवृत्तीची रुपं अनेक असतात, काही लोक दुसर्यावर आपली मतं लादणार काही स्वतःलाच बंदी बनवणार. देव असो वा कैदी, दु:ख एकच असतं; दोघंही बंदीवान असतात, देवळात असोत वा पिंजर्यात! अनेक हजार वर्ष जुन्या असलेल्या भारतीय समाजात स्थल-कालपरत्वे अनेक बदल होत गेले, आणि त्याप्रमाणे रुढी, परंपराही बदलत गेल्या, कधी स्वसंरक्षणासाठी, कधी नवीन शोध लागले म्हणून! पण व्यक्ती आणि पर्यायाने समाजात बदल हे कोणत्याही टिकून राहिलेल्या संस्कृतीचं एक वैशिष्ट्य ठरावं. पण आपण खरोखर सहजरित्या बदल स्वीकारतो का?
बदल कसे होतात, का होतात, कोणामुळे होतात? छोटे-मोठे बदलतर होतच असतात. सुरुवातीला बदलांना बराच विरोध होतो पण हळूहळू ते बदल बहुजनमान्य होतात आणि मग बहुतांश वेळा, या नाही तर पुढच्या पिढीकडून, विरोधाच्या जागी अनुकरण व्हायला सुरूवात होते. अगदी आपल्याकडची छोटीशी गोष्ट घ्यायची झाली तर आता चाळीशी पार केलेल्या लोकांशी बोललं तर ते लोक त्यांच्या वेळेला बेल-बॉटम ट्राउझर्स घालायला लागले तेव्हा आरडाओरडा झाला असं सांगतील; पण त्यांतलेच अनेक लोकं आपल्या पुढच्या पिढीतल्या मुली सर्रास जीन्स, ट्राउझर्स घालून फिरतात याची तक्रार करतील. पण असे बदल सहज चालून जातात, बहुसंख्य मुली ट्राउझर्स घालून फिरताना दिसतात आणि काही वर्षांतच विरोध मावळतो. पण माणूस म्हणजे फक्त त्याचे कपडेच असतात? आधुनिक कपडे घातले की विचारही तसेच होतात का? आणि आधुनिक विचार म्हणजे तरी नक्की काय? आधुनिक विचार म्हणजे फक्त पाश्चात्य विचार का? आणि पाश्चात्य विचार म्हणजे नक्की काय? अमेरिका आणि इंग्लंड (+ बहुतेकसा पश्चिम युरोप) या दोन भूभागातल्या लोकांच्या विचारातही फार फरक आहे, अटलांटीक महासागराच्या ईशान्येला लोकांचा व्यक्तीस्वातंत्र्यावर आणि त्याच वेळी (खर्या) समाजवादावर बराच जास्त विश्वास आहे असं माझं व्यक्तिगत मत.
माणसातले बदल हे परिस्थिती बदलल्यामुळे होतात तर काही बदल हे इतर काही विचारांमधल्या बदलामुळे होतात. उदाहरणार्थ, औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या कामाचं स्वरूप बदललं त्यामुळे कपड्यांचे रंग, पोत, फॅशन हे कामाच्या ठिकाणी का असेना पण बदललं. तसंच पूर्वीच्या राजेशाहीची जागा लोकशाहीने घेतली त्यामुळे लोकांमधे बदल झाले, आणि कायद्यापुढे सगळेच सारखे असा विचार मान्य होऊ लागला; विचाराधारेतल्या बदलामुळे माणसांची विचार करण्याची पद्धतही बदलली. स्वातंत्र्य हा शब्द किमान ओळखीचा झाला. आज आपल्याला राजकीय स्वातंत्र्य आहे, कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं ते आपण ठरवतो. कुठे रहायचं, काय प्रकारची नोकरी करायची याचंही स्वातंत्र्य आपल्याला आहे. पण आपण खरोखर "स्वतंत्र" आहोत का? बदलांच्या विरोधाची जागा अनुकरण घेतं, पण ते अनुकरण प्रत्येक वेळा करता येतंच का? लोकल ट्रेनमधे साड्या, ओढण्या सांभाळण्यापेक्षा ट्राउझर्स-टॉप सोयीस्कर असतात म्हणून वापरले जातात पण विचारांचं अनुकरण करता येतं का? स्वातंत्र्य दुसर्याकदून मिळवता येतं का स्वतःपासूनच स्वातंत्र्य मिळू शकतं का? आपण स्वतःलाच जखडून ठेवतो का?
मला असं वाटतं हो, आपणच स्वतःलाच कोंडून ठेवतो, कधी देव बनण्याच्या प्रयत्नात कधी कष्ट टाळण्यासाठी! मुलींना लहानपणापासूनच सुपरवुमन, सुपरमॉम कशा महान असतात हे शिकवलं जातं आणि तिच्याकडून काम करवून घेतलं जातं; मुलांना (मुलगे) आज्ञाधारक असणं किती आदर्श असतं हे किंवा असंच काहीसं शिकवलं जातं आणि मग आपली (बहुदा पालकांची) म्हातारपणाची सोय लावली जाते. पाश्चात्य देशातल्या तान्हुल्यांच्या तोंडातलं बूच पाहिलं की मला पूर्वी वाईट वाटायचं. आई-बाबांना त्यांचा 'त्रास' नको म्हणून मुलांचं तोंड बंद करणं बरोबर नाही असं वाटायचं. पण हीच मुलं जरा बोलायला लागली, स्वतःचं स्वतः "भूक लागली", "झोप येत्ये" म्हणायला लागली की ती बूचं काढतात ती कायमचीच! पण आपल्याकडे काय दिसतं? थोडी समज यायला लागली की मग "तुला काय समजतंय, मी मोठा/ठी आहे ना तुझ्यापेक्षा?" असंच ऐकवलं जातं. विचार करण्याची सवयच तर सोडाच पण संधीही मिळत नाही. आणि या साच्यातून तयार होऊन आपण "एवढ्या वर्षांची परंपरा आहे, प्रथा आहे, काहीतरी तथ्य असणारच त्यात", असा एक गुळमुळीत आणि सोपा विचार करतो. सोपा विचार मी याला यासाठी म्हणते की एकदा चौकट आखून दिलेली असली की मग त्यातच स्वतःला बसवणं सोपं असतं. संस्कृत (किंवा जर्मनही घ्या) सारखी भाषा ज्यात व्याकरणाचे काटेकोर नियम आहेत त्यात प्रथम नियम शिकायला लागतात. लहानपणापासून तेच कानावर पडत असेल तर उत्तमच! हे नियम एकदा रटले की मग काही प्रश्नच येत नाही, वेगळा विचार करण्याची गरजच नसते. इथे मुद्दा भाषेचा अजिबातच नाही आहे, पण एक उदाहरण दिलं. शिस्त ही काही प्रमाणात चांगलीच, पण कधी आणि किती? चारचौघात असताना आपल्या स्वातंत्र्यामुळे किंवा आपल्या 'बेशिस्ती'मुळे दुसर्याच्या स्वातंत्र्याचं आकुंचन झालं नाही म्हणजे शिस्त पुरेशी नाही का?
पण स्वतःच स्वतःसाठी नेहेमीच्या चौकटीपेक्षा वेगळी चौकट आखायची असेल तर? अशी चौकट जी इतरांच्या चौकटीला बर्याचदा छेदत नाही पण छळतही नाही. काहीही नवीन गोष्ट करायची असेल तर बर्याचदा त्यासाठी आधी स्वतःचाच विरोध मोडावा लागतो. आखून दिलेल्या चौकटीत जगणं खूपच सोपं असतं. जगानी नियम बनवलेले असतातच आपण फक्त ते मान्य करायचे, "का" असा प्रश्न न विचारता! मुलींना लहानपणापासूनच त्यांनी घरही सांभाळायचं, सगळ्यांची "सेवा" करायची आणि करीयरमधेही यशस्वी व्हायचं असं शिकवायचं, भले तिला स्वत:ला माणूस म्हणून जगता नाही आलं तरी चालेल. मुलांना लहानपणापासून मोठ्यांचं ऐकायचं आणि हाताखालच्या (म्हणजे वयानी लहान) यांच्यावर अधिकार गाजवायचा याचं शिक्षण मिळतं. पण माणूस म्हणून जगायला आणि मुख्य म्हणजे दुसय्रांनाही माणसासारखं वागवायच्या शिक्षणाचं काय? घरातल्या मुलांनाही घरातले निर्णय घेण्याचा हक्क असतो, आपल्या स्वत:बद्दलचे निणय घेण्याचा हक्क असतो याची जाणीव कधी होतच नाही, किंबहुना होणारच नाही याची काळजी घेतली जाते, "तू लहान आहेस, तुला काय कळतंय?" आणि हीच मनोवृत्ती पुढे आपल्याला विचार करू देत नाही. मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी चांगल्याच, छापलेलं आहे म्हणजे ते खरंच असणार असा काहीसा आपला विचार बनतो आणि मग फारसं पटत नसलं तरीही आपण अनेक गोष्टी मान्य करतो.
एकाने एखादी गोष्ट अमान्य केली आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली की त्याला अडवणार्यांचीही कमतरता नसते. थोडक्यात कोणीही एका ठराविक चौकटीच्या बाहेर पडूच नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते. आणि या पिंजर्यातून कोणी निसटली की ती व्यक्ती बर्याचदा फार लक्ष देण्याजोगी रहात नाही. अर्थात याला अपवाद आहेत, चौकटीच्या बाहेर पडलेली व्यक्ती लौकिकार्थानी अतिशय यशस्वी झाली, म्हणजे चांगल्या मार्गाने पैसा कमावून श्रीमंत होणं किंवा नावापुढे पदव्यांची माळ असणं, की मग मात्र त्या व्यक्तीच्या चौकटीतून बाहेर पडण्याकडे कौतुकानी पाहिलं जातं. अर्थात क्रांतिकारक दुसर्याच्या घरातच जन्माला आलेला बरा असतो. प्रत्येक माणसाची चौकटीबाहेर पडून(ही) यशस्वी होण्याची कुवत असतेच असं नाही; अशाच माणसांसाठी चौकट बनवलेली असते. ज्याला विचार करायचा नाही किंबहुना ज्याची तेवढी कुवत नाही त्याच्यासाठी चौकट आहे, पण चौकट माणसांसाठी आहे, माणसं चौकटीसाठी आहेत का? सगळीच माणसं सारखी नसतात मग ही चौकट सारखी का असावी?
स्वतःशी केलेला थोडा विचार; स्त्रियांचं गाडी चालवण्याचं कौशल्य, "बंदिनी"चं शीर्षक गीत, या विषयांवरून थोडा विचार केला तेव्हा असं वाटलं:
"स्त्री जन्मा ही तुझी कहाणी" असं का म्हणायला लागावं? स्त्री हीपण माणूसच आहे असा विचार स्त्रिया स्वत:च का करु शकत नाही. स्वतःच्या फावल्या वेळाचा उपयोग घरातली कामं करण्यासाठी करायचा का गाडीचं बॉनेट उघडून आतल्या यंत्रांचा अभ्यास करण्यात हे ठरवण्याचं स्वातंत्र्य घरातल्या मुख्य स्त्रिला मिळत नाही; किंबहुना ती घेतच नाही. कारण आपला वेळ आपल्यासाठीही असतो हे तिच्या गावीच नसतं, असं तिला दाखवलंच जात नाही. स्त्रीची देवी बनवलेली असते, "आमची मुलगी किती काम करते घरात" याचं कौतुक होतं, पण "घरचं काम ही सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळेजण थोडा वेळ काढतात आणि होऊन जातं", असा विचार किती पालक करतात? मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळाले, "आईला वेळ नसतो का अभ्यास घ्यायला?", घर अस्वच्छ आहे, "काय ही बाई, घरात थोडं कामही करता येत नाही!" असाच विचार होतो आणि दुर्दैवानी या विचारांना स्त्रियाच प्रथम बळी पडतात. "आत्ता मजा करुन घे, सासरी जाऊन कामं करायचीच आहेत", असं आपणच आपल्या मुलीला, भाचीला ऐकवतो, पण मुलांना घरातल्या कामांच्या या जबाबदारीची जाणीव किती पालक करून देतात, बोलण्यातून आणि स्वतःच्या वागण्यातूनही? घरात कामांमधे मदत केली तर "काय बायकीपणा करतोस" किंवा "बायकोनी मुठीत ठेवलंय" हे आपण मुलांना म्हणतो ना? स्त्रियांना गणित जमत नाही, तर्कशास्त्र जमत नाही म्हणताना मजा वाटते पण ज्या स्त्रिया तर्कशुद्ध विचार करतात त्यांच्या "नवर्याला काय त्रास" असेल/होईल असा तर्कदुष्ट विचार डोक्यात येतोच! लग्नानंतर मुलीनीच घर सोडायचं, स्वतःची जन्मापासून असलेली ओळख संपवायची, "आता तू त्यांची" असं तिनेच ऐकायचं जसं काही ती एक वस्तू आहे. यात मला सगळ्यात राग येणारा प्रश्न, "मुलगी कुठे दिली?" किती क्रूर आहे हा प्रश्न, पण आपण काही चूक करत आहोत हे विचारणार्याला कळतही नाही, कारण "तशीच पद्धत आहे" आणि एखादी गोष्ट एकदा रूढ चौकटीमधली असली की ती चूक असू शकतच नाही!
आपलं आयुष्य कसं असावं याचा विचार करण्याचं स्वातंत्र्य मोठ्या लोकांनाही मिळतंच असं नाही. सचिन तेंडूलकर, आता म्हातारा होत चालला आहे तरी आपण घरात टी.व्ही.वर बघत म्हणणार, "अजून वीस वर्ष सचिननी खेळलं पाहिजे". तो पण माणूस आहे, त्याचं त्याला समजतं, त्याचं त्याला ठरवू देत, पण नाही. त्याला एकदा देव म्हणून बंदी बनवायचं आणि मग खरंतर माणूस असणारा सचिन चुकला की आपण चुकचुकत बसायचं. पण तेव्हाच अतिशय हुशार गणाले जाणारे अल्बर्ट आईनश्टाईन किंवा स्टीफन हॉकिंगही आयुष्यातली किती (कमी) वर्ष महान शोध लावू शकले याकडे दुर्लक्ष करायचं.
माणसाला देव किंवा बंदीवान न बनवता माणूस म्हणून जगू देणं एवढं कठीण आहे का?
No comments:
Post a Comment