Thursday, February 24, 2011

नर्मदा बचाव आंदोलन: एक संवाद

१६ फेब्रुवारीला IISER (Indian Institute for Science Education and Research) पुणे इथे श्रीपाद धर्माधिकारी यांचं On Narmada Struggle and Beyond या विषयावर व्याख्यान होतं. श्रावण आणि मी तिथे गेलो होतो.

'नर्मदा बचाव आंदोलना'ची त्यांनी ओळख करून दिली. फक्त पाण्याच्या फुगवट्यामुळेच लोकं विस्थापित झालेले असं नाहीत तर १९६२ साली नेहेरूंचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी ज्या शेतकर्‍याची जागा 'तात्पुरती' घेतली ते कुटुंबही आज अनअफिशियली विस्थापितच आहे. (अशा छोट्या छोट्या गोष्टी मला माहित नव्हत्या.) ती जमिन परत मिळेल असं सांगून घेतली, पण ती तर जमीन गेलीच शिवाय कॉलनी उभी करण्यासाठी इतर सहा कुटुंब विस्थापित झाली. ही सुरूवात होती. पुढे काय काय घडत गेलं याचा घटनाक्रम त्यांनी सांगितला. फार तपशीलात आत्ताच शिरत नाही. आंदोलन सुरू झालं तेव्हा मी अक्षरओळख शिकत होते, त्यामुळे तुमच्यापैकी अनेक लोकांनाच माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. त्यामुळे त्यातले काही मुद्दे जे मला ठळकपणे आठवतात ते लिहीते.

१. आंदोलनाचा मुख्य हेतू - हा प्रकल्प देशाच्या भल्यासाठी आहे हे सिद्ध करा. सरकारची भूमिका - तुम्ही कोण हे विचारणारे?
२. आंदोलनाचा 'दुसरा' हेतू - प्रकल्पग्रस्तांना योग्य भरपाई, आणि प्रकल्पग्रस्त म्हणजे फक्त पाण्याच्या फुगवट्यात ज्यांची घरं, शेती जाणारे तेच नाहीत, तर ज्यांच्या उत्पन्नाचा स्रोत जाणार आहे ते सगळे. उदा: सरदार सरोवर ते अरबी समुद्र या भागातले, नर्मदेत मासेमारी करणारे.

काही प्रश्नोत्तरं:
१. आंदोलनाची सुरूवात १९८५ साली झाली तर न्यायालयात जायला नव्वडीचं दशक का उजाडलं?
आधी सरकारचा पाठपुरावा केला. पत्रं लिहीणं, मागण्या करणं या सगळ्यानंतरही जेव्हा धरणासाठी काम सुरू झालं तेव्हा प्रकरण न्यायालयात नेलं. बोलताना केलेली कमेंट, "न्यायालयात न्याय मिळण्याची शक्यता आत्तापेक्षा ८० च्या दशकात जास्त होती."
२. माहितीचा अधिकार ही अलिकडच्या काळातली गोष्ट आहे, तेव्हा धरणासंदर्भात माहिती कशी मिळवली?
With difficulty (माझे शब्द). काही सहानुभूती असणारे सरकारी कर्मचारी
३. रस्ते, रेल्वे बांधतात तेव्हा विस्थापित होतात, ते आंदोलन करताना दिसत नाहीत काय?
गावातल्या एका, काही शेताचा भाग जाणं वेगळं, त्याची भरपाई गावातूनच करता येते. धरण बांधतात तेव्हा संपूर्ण गावच पाण्याखाली जातं.
४. सरदार सरोवर तयार झालं आहे, धरण नकोच अशी भूमिका आधी आंदोलनाची होती. आंदोलन हरलं नाही का?
मूळ भूमिकाच पकडून ठेवायची तर हो. पण सामान्य खेडूतांना जिथे सरकारी कर्मचारी एका डेस्कावरून दुसर्‍या डेस्कावर नाचवत होते तिथे तेच सरकारी बाबू त्यांच्या पाठी पाठी यायला लागले. आंदोलनात स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. स्त्रियांचं सबलीकरण हे आंदोलनाचं आणखी एक यश.
५. श्रीमंत शेतकर्‍यांचा सहभाग
आर्थिक सहभाग होता, फार वेळ दिला नाही तरी!
६. धरण बांधता आलं नाही तर प्लॅन बी होता काय?
नाही. कधीच नव्हता. धरण बांधायची घोषणा १९६२ साली करून प्रत्यक्षात काम ८० च्या दशकात सुरू झाल्यामुळे स्वयंसेयी संस्थांच्या मदतीने अनेक खेड्यापाड्यांमधे छोटे बंधारे, रेन वॉटर हार्वेस्टींग सुरू झालं. गुजराथचं शेतकी उत्पादन २००९ साली ९.५% ने वाढलं आणि ती वाढ सौराष्ट्र आणि कच्छ या सेमी-आरीड भागांमधून झाली आहे. भूजल पातळीत २.५ पट वाढ झाली.
७. देशाच्या इतर भागांमधून आंदोलनात सहभाग कितपत होता?
बर्‍याच मोठ्या शहरांमधे आंदोलनाला पाठिंबा मिळाला. सौराष्ट आणि कच्छला पाणी मिळणार असा प्रचार गुजराथमधल्या पाठ्यपुस्तकांमधून होतो. त्यामुळे आंदोलनाला त्यांचा विरोध होता. पण साधारण १/४ सौराष्ट्र आणि कच्छचा १०% भाग यांनाच पाणी मिळणार होतं. त्यामुळे "आमच्या नावावर प्रचार करू नका" अशी मागणी त्या भागांमधूनही झाली.
८. आत्तापर्यंत हे आंदोलन अहिंसक पद्धतीने सुरू होतं, पुढे?
माहित नाही.
९. अलिकडे बातम्यांमधे नर्मदा आंदोलनाबद्दल ऐकायला येत नाही. अपडेट्स?
विस्थापितांचे प्रश्न सोडवणे, आणखी विस्थापन होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेतच.
आंदोलन २५ वर्ष सुरू आहे. न्यूज व्हॅल्यू फारशी नाही. एखादं आंदोलन किती वर्ष पहिली बातमी बनणार? (विनीलच्या अपहरणामुळे आत्ता फेसबुक वापरणारे आणि आदिवासी एकाच बाजूने बोलत आहेत. अजून काही महिन्यांनी?)

5 comments:

भानस said...

एखादं आंदोलन किती वर्ष पहिली बातमी बनणार? (विनीलच्या अपहरणामुळे आत्ता फेसबुक वापरणारे आणि आदिवासी एकाच बाजूने बोलत आहेत. अजून काही महिन्यांनी?)

अगदी हाच प्रश्न मनात आला...

sharayu said...

याला नर्मदा बचाव आंदोलकांच्या नेत्यांची धरसोड वृत्ती
जबाबदार आहे. प्रथम पर्यावरणाच्या नावाखाली विरोध, नंतर इतर कारणांसाठी विरोध असे केल्याने
नर्मदा बचाव आंदोलन विकासाच्या विरोधात आहे हे स्पष्ट झालेच होते.

Naniwadekar said...

नर्मदा आन्दोलनामुळे किती लोकांची राहती ज़ागा गेली? इतर धरणांमुळे (भाक्रा-नांगल वा कोयना) ज़े स्थलान्तर आवश्यक झालं असेल त्या तुलनेत ही संख्या फार जास्त होती का? कारण या चळवळीबद्‌दल जितकं कानावर आलं आहे, तितकं इतर धरणांबद्‌दल कधीच आलं नाही.

'सरकारचा नर्मदा-प्रकल्प चांगला आहे, ही मेधा (पाटकर) उगीच आक्रस्ताळेपणा करते आहे', असं विधान दुर्गा भागवतांनी केलं होतं. त्यावर लगेच 'दुर्गाबाई बरोबरच बोलतील' असं सुचवण्याचा माझा हेतू नाही. पण सत्याची मक्तेदारी आपल्याकडेच आहे, हा आव बाबा आमटे आणि पाटकर बाई आणतात, आणि अनेक हिन्दु मेले तरी शान्त राहून एक मुसलमान अडचणीत आला तरी गोंधळ घालतात, हा या दोघांबद्‌दल माझा अनुभव आहे. त्यामुळे आमटे आडनावाच्या कोणावरही विश्वास न ठेवण्याचा माझा पूर्वग्रह आहे.

या आन्दोलनांचा स्त्रियांच्या सबलीकरणाशी काय संबंध आहे? 'महिला सबलीकरण', 'स्वातंत्र्य', 'विकास' हे शब्द सगळीकडेच पुढे करण्याची टूम आली आहे. पाटकर-नर्मदा-आन्दोलनामुळे महिलांना फायदा झाला असेलच तर तो कसा, हे पटेल अशा उदाहरणांद्‌वारे दिसतं का? पंधरा वर्षांपूर्वी मला (आणि इतरांना) एकदा या आन्दोलनाच्या (सबल आणि कर्कश) महिलांनी एका कार्यक्रमात पैसे मागितले. 'मला धरणाचे फायदे-तोटे माहीत नाहीत' हे मी म्हणताच माझ्या अज्ञाननिवारणाचा प्रयत्न न करता त्यांनी पैसे न मिळाल्याबद्‌दल आश्चर्य व्यक्त केलं. सगळेच आंदोलक असेच असतात; पण हे देखील त्याला अपवाद नाहीत, आणि मेधा पाटकरांच्या नावावर पुण्यवान होऊ बघतात. विषयान्तर करायचं झाल्यास मी डोळे झाकून पैसा फक्त हेडगेवारांशी संबंधित कामालाच देईन. तो क्वचित चूक ठिकाणी पडू शकतो, पण निदान त्या एकूण कामात मला आदर वाटणारी परंपरा आहे.

Naniwadekar said...

'समुद्रापारचे समाज' या मिलिन्द बोकिलांच्या पुस्तकात एक असा दावा वाचला की धरण हा प्रकार मुळातच चूक आहे. एशियन लोकांना म्हणे पाणीवापराच्या चांगल्या पद्‌धती पूर्वीपासून माहीत आहेत. युरोपात धरणाची कल्पना सुचली. तिचे फायदे ठळक दिसतात म्हणून ती सर्वत्र अंगिकारल्या गेली. पण तिचे अनेक दुष्परिणाम आहेत ज़े नन्तर भोगावे लागतात. इजिप्तात 'आस्वान' धरणामुळे असे दुष्परिणाम झाल्याची बातमी आली होती.

मागल्या मोसमात पाकिस्तात आलेल्या पुराचाही दोष मोठ्या प्रमाणात 'आधुनिक जलसिंचनामुळे पाण्याचे प्रवाह बदलले' असा दावा करून त्याला देण्यात आला होता. या सर्व विधानांच्या सत्यासत्यतेबद्‌दल मला स्वत:ला काहीही माहिती नाही.

Sanhita / Aditi said...

सर्व प्रतिक्रिया थोड्या उशीरानेच वाचल्या.

माझा या विषयाचा अजिबात अभ्यास नाही. पण माहिती करून घ्यावीशी वाटली म्हणून मी त्या व्याख्यानाला गेले. तिथे जे ऐकलं त्याचा काही भाग इथे मांडला. गेल्या काही दिवसात थोडंबहुत वाचन आणि विचार केल्यानंतर मला अनेक मुद्दे पटले. सात हजार कोटींच्या प्रकल्पात आणखी एक-दोन हजार कोटी (थोडे कमी जास्त, मला नक्की कल्पना नाही.) टाकून कदाचित व्यवस्थित पुर्नवसन करता आलं असतं. तसं केलं असतं तर आंदोलनाला फारसा पाठिंबाच मिळाला नसता, आज तिथे नक्षलवाद/माओवाद पसरतो आहे तसंही झालं नसतं. आत्तापर्यंत धरणाचा खर्च सत्तर हजार कोटी झाला आहे.

विस्थापित लोकांची आधी स्थिती काय होती, धरणाशिवाय काय असती, आंदोलनाशिवाय काय असती हा विचारही मला या बाबतीत महत्त्वाचा वाटतो. याची उत्तरं माझ्याकडे नाहीत.

Followers