Saturday, January 23, 2010

आठवणी

आंतरजालावर आणि लेखी साहित्यातही अनेक लोकं आपल्या बालपणात रमलेले दिसले. ते वाचलं आणि वाटलं "मला लहानपणाची आठवण अशा पद्धतीने होत नाही." ... मला आठवते एक शेंबडी, रडूबाई, जिला सगळे काकू म्हणायचे आणि ती त्यावर चिडायची. आजची मी आणि तेव्हाची मी ... वेगळीच माणसं आहेत का काय एवढा संशय येण्याएवढी मी बदलले.

मला आठवतंय माझी पहिली ते चौथीतली मैत्रिण पुढे मला कधीच भेटणार नव्हती, म्हणून मी रडले होते. पण आता मला तिचा चेहेराही आठवत नाही. पाचवीत मी शाळा बदलली. तिथे मराठी शिकवणार्‍या एक बाई म्हणायच्या, "मला माझ्या आई-वडीलांची आठवण झाली की मी माझ्या शाळेत जाते. तिकडे गेलं की कोणी डोक्यावर हात ठेवणारं कोणी वडीलधारं असल्यासारखं वाटतं." शाळेत शिकत असताना मला ते कधी पटलं नाही, पण तेव्हा असं बोलता येतं हे माहितच नव्हतं. आणि आता मी "कुठे उगाच त्यांच्या या वयात त्यांच्या भावनांशी विरोध दर्शवून वाद उकरून घ्या" या विचाराने बोलत नाही. कृती तीच आहे पण तरीही ते करणारी मी फार बदलले आहे. आणि हा बदल झाला याचा मला आनंद आहे.

मला शाळेत जावं असं काही मनापासून वाटत नाही. कधीमधी ठाण्याला गेले, शाळेच्या वेळात त्या बाजूला गेले, घरी कोणी जेवणासाठी वाट पहात नसेल तरच मी शाळेत आत जाते. "ही माझी शाळा" असं काही उचंबळून वगैरे येत नाही. शिक्षकांच्या खोलीत खूपच कमी ओळखीचे चेहेरे असतात. त्यातल्या काही चेहेर्‍यांवर "अरेच्चा, ही एवढी कशी काय शिकली", हे अगदी व्यवस्थित दिसतं. उरलेले चेहेरे खूप सुरकुतलेले असतात, आणि त्या सुरकुत्यांमधून अभिमान आणि प्रेम दिसतं, तेवढंच घेऊन मी बाहेर पडते. पण तरीही ही शाळा 'आपली' वाटत नाही, कारण तहान लागलेली असली तर पाणेर्‍यावरची घाण पाहून तिकडे पाणी पिववत नाही. उगाच नाही आई रोज पाण्याची बाटली द्यायची असा विचार डोक्यात येतो. आणि शी! अजून हे संडास असेच घाणेरडे, इथे आपण कधी(तरीच) जायचो या विचाराने अजूनही किळस येते. या शाळेबद्दल मी अभिमान बाळगावा असं अनेकांना वाटतं, पण म्हणजे काय हे मला अजूनही समजत नाही. या शाळेत अनेक शिक्षक भेटले, ज्यांच्याकडे पाहून इतरांनी समजून घ्यावं, वाईट शिक्षक असेच असतात. पण एक खूप चांगली मैत्रिण मात्र याच शाळेत मिळाली. तिची अधूनमधून आठवण आली की तिला इमेल करायचं, तिचा प्रतिसाद येतो त्याच आठवड्यात, तो वाचून आताच्या मित्रांबरोबर चहाला जायचं.

लहानपणी मी बिल्डींगमधेही खूप दंगा केला, पण तेव्हाही मी रडूबाईच होते. तेव्हाचे बरेचसे मित्र माझ्याप्रमाणेच आधी शिक्षण आणि आता नोकरीच्या निमित्ताने तिथे नाहीत. मीही क्वचितच परत जाते, वर्षातून दोनदा भेटलो तरी खूप! भेटलो की गप्पा रंगतात, आवडीनिवडीप्रमाणे चहा, सरबत, भेळ, वडे हादडतो, पण कधीच (कोणालाही) ते दिवस गेल्याचं वाईट वाटलेलं दिसत नाही. थोडंफार दु:ख होतं ते एक नारळ, एक बकुळीचं झाड आणि इतर बरीच झुडपं बिल्डींग पुन्हा बांधली त्यात गेल्याचं!

हो, ती बिल्डींगही पुन्हा बांधली गेली. आमच्या तळमजल्याच्या चार घरांमधे एवढ्या वेळा पावसाचं पाणी घुसायचं की आम्ही चार घरं तर अगदी आनंदात होतो, पण इतरही अनेकांना बिल्डींग पुन्हा बांधायला पाहिजे याची जाणीव होती. जुन्या घराचे असे दुर्दैवी दशावतार पाहून मला आणि भावाला दु:ख व्हायचंच, पण त्याही पेक्षा जास्त आनंद झाला आता कोरंकरकरीत घर मिळणार याचा! भाऊ आणि वहिनीने आत्ता घर जे काही मस्त रंगवलं आहे, नवीन फर्निचर केलं आहे ते पाहून तर मला आणखीनच जास्त आनंद होतो. पण शिक्षणाच्या निमित्ताने अनेक वर्षांपूर्वीच घर सोडलं, मधल्या काळात 'घर' नक्की कुठे आहे हाही प्रश्न पडला होता. पण आता मात्र कन्सेप्ट्स क्लियर आहेत. मी जिथे रहाते तेच माझं 'घर' आहे. सध्या नाईलाजास्तव माझी दोन घरं आहेत, पण ती माझी आहेत. नवीन बांधलेल्या इमारतीत माझा मालकी हक्क असला तरी ते घर माझं नाही, भाऊ-वहिनीचं आहे याची व्यवस्थित जाणीवही आहे. माझं लहानपण अजूनही मला आठवतं, अनेक सुखद आणि दु:खद गोष्टी अगदी अलिकडे घडल्या आहेत अशा लक्षात आहेत. पण ते लहानपण गेलं याचं दु:खही नाही आणि आनंदही नाही.

शिक्षणासाठी घराबाहेर पडले तेव्हा परदेशात दुसरं घर बनलं. तिथले मित्र सगेसोयरे बनले. त्यातल्या एकाचा, माईकचा, एक मित्र बर्‍याचदा या घरी शनिवार-रविवारी यायचा. पण हाच माईक अनेकदा असंही म्हणायचा, "पूर्वीच्या मित्रांशी माझा फारसा संबंध नाही, आणि इथून आपण बाहेर पडलो की तुमच्याशीही माझा फार संबंध राहिलंच असंही नाही". तेव्हा त्याचं बोलणं क्रूरपणाचं वाटायचं. पण अचानक एका मैत्रिणीचं इमेल आलं, तिने तिचा थिसीस सबमीट केल्याचं, आणि लक्षात आलं, गेल्या चार महिन्यात या कोणाशीही आपला काहीही संबंध नव्हता. संध्याकाळीच दोघांशी स्काईपवरून बोलले आणि छान वाटलं. पण मँचेस्टर विमानतळावर, आता माहेर संपलं, अशा आविर्भावात मी रडले होते त्याच्या एक टक्काही वाईट वाटलं नाही. दीडेक वर्षांनंतर माईकचं इमेल आलं, तो भारतात येणार होता तेव्हा मात्र खूपच आनंद झाला. कॉन्फरन्स संपल्यावर मुद्दाम पाच दिवस सुट्टी काढून तो राहिला होता, आग्रहाने मला पावभाजी बनवायला सांगितली आणि माईक तेव्हा वाटला होता तसा अजिबात क्रूर नाही याची जाणीव झाली.

गेल्या वर्षाच्या शेवटी एक मित्र, एक मैत्रीण ही संस्था सोडून पुढच्या प्रवासासाठी देशाबाहेर गेले. आठवडा-दहा दिवस त्यांची कमतरता भासली, पण आहे त्यात जुळवून घेतलं. अजूनही आठवण झाली की आम्ही स्काईपवर गप्पा मारतो, जसे काही पूर्वीसारख्याच माझ्या घरात बसून कॉफी पित टवाळक्या सुरू आहेत. छान वाटतं.

पण अजूनही जुने मित्रमैत्रिणी जवळ नाहीत याचं दु:ख असं होत नाही. कदाचित पृथ्वी गोल असल्याचं अनेकदा दिसलं आहे म्हणून असेल, कदाचित कुठेही गेले तरी भेटणार्‍या त्याच आणि तशाच प्रकारच्या माणसांमुळे असेल. ही नवीन माणसं भेटतात आणि संगत सुटते तेव्हा एक मैत्र जुळलेलं असतं. लिहायला सुरूवात केली तेव्हा वाटत होतं की मला बालपण संपल्याचं दु:ख होत नाही याबद्दल लिहेन. पण आता लिहीत गेल्यावर असं वाटतंय, मला नेहेमीच खूप चांगले मित्र-मैत्रिणी मिळाले याचं खूप समाधान वाटतंय. त्याच सगळ्या मित्र-मैत्रिणींना हा लेख अर्पण!

6 comments:

Naniwadekar said...

> हाच माईक अनेकदा असंही म्हणायचा, "पूर्वीच्या मित्रांशी माझा फारसा संबंध नाही, आणि इथून आपण बाहेर पडलो की तुमच्याशीही माझा फार संबंध राहिलंच असंही नाही". तेव्हा त्याचं बोलणं क्रूरपणाचं वाटायचं.
>-----

सतत मित्र बदलत राहण्याचा तुम्हाला स्वत:ला अनुभव असूनही माइकचं बोलणं क्रूरपणाचं का वाटलं?

- नानिवडेकर

भानस said...

Sanhita, मित्र-मैत्रिणी बदलत राहणारच.अगदी एखादीच/दाच लहानपणीचा टिकेल.शाळेत/शाळेच्या आठवणीत मी पुन्हा बालपण जगते.निदान प्रयत्न तरी करते.
"मला माझ्या आई-वडीलांची आठवण झाली की मी माझ्या शाळेत जाते. तिकडे गेलं की कोणी डोक्यावर हात ठेवणारं कोणी वडीलधारं असल्यासारखं वाटतं."

मलाही असे कधीच वाटले नाही.कारण नेमके सांगता येणार नाहीच... आजकाल आपल्या सगळ्यांच्या मनाने संपूर्ण प्रॆक्टीकल अप्रोच ठेवायला व स्विकारायलाही सुरवात केलेली आहे. भावनांन मध्ये वाजवीपेक्षा जास्त गुंतून न पडण्याची सवय अंगी भिनवून घेतली आहे. सावध पवित्रा. पण म्हणून मैत्र जोडण्याची सवय म्हणा गरज म्हणा किंवा आपसुक जुळतेच असेही म्हणता येईल, क्रिया घडतच राहते. जुने मित्र-मैत्रिणी कालांतराने थोडेसे मागे पडले तरी मनातून जात नाहीत. म्हणूनच तर हा लेखप्रपंच घडला असेल...:)
लेख आवडला.( टिपणी जरा जास्तच मोठी झालीये... क्षमस्व )

Sanhita / Aditi said...

@नानिवडेकरः अगदी निर्जन ठिकाणी एका घरात तीन वर्ष काढल्यावर जी मैत्री, जे नातं जुळलं ते अजूनही वेगळंच आहे. आजही आमच्यापैकी कोणीही इतरांच्या देशात, नाहीतर खंडात जात असेल तर दुसर्‍याला भेटून यावं असा प्लॅन ठरतो, एवढी ही मैत्री आजही घट्ट आहे. पण तोंडावरच सरळ 'मी उगाच इमेल लिहीणार नाही' असं म्हणणं तेव्हा निश्चितच आम्हा कोणाला पटलं नव्हतं. आज ते तेवढंच खरं आहे, जेवढी आमची ५-६ लोकांची मैत्री!
आणि मी मित्र-मैत्रिणी बदलले हे म्हणणं चुकीचं आहे (अगदी गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड बदलली/ला असं वाटतं)

असो. प्रतिक्रियांबद्दल आभार.

Naniwadekar said...

Actually I rather liked the grand declaration in your article that you do not feel any emotional attachment to your school. Me neither. But after stressing how you feel differently than the majority of bloggers who wax nostalgic about their childhood and their school, it was rather disappointing to find the article end on a note which suggested that you are not different from the very same bloggers. To wit, you are also grateful that 'चांगले मित्र-मैत्रिणी मिळाले याचं खूप समाधान'. You are also similarly sentimental that you dedicated the article to the friends. These themes are commonly seen among bloggers. I first sensed this drift towards the common ground when you wrote how you found Mike's talk cruel. Of course you have yourself admitted that the theme of the post took an unexpected turn.

Secondly, do you really feel a lack of association with the school because of the unclean surrounding near the water-tap? By this token, do you also feel emotionally disassociated with India itself because it is far less clean than Manchester? I myself like the cleanliness to be found in Europe or America. But in spite of the dust and grime, there is no doubt in my mind that India is my real home, warts and all.

"या शाळेबद्दल मी अभिमान बाळगावा असं अनेकांना वाटतं, पण म्हणजे काय हे मला अजूनही समजत नाही." -> Do you similarly fail to understand why people feel happy at the approach of Diwali or Ganesh Festival?

- dn

Sanhita / Aditi said...

@नानिवडेकरः
शाळा - देश ... तुलना म्हटली तर चुकीची वाटते आहे, म्हटलं तर योग्य.
अर्थातच शाळेच्या बाबतीत अस्वच्छता ही एवढी एकच गोष्ट नाही आहे. मला कधीच कळलं नाही की शाळेबद्दल अभिमान म्हणजे नक्की काय असतं? मला शाळेबद्दल काही वाटण्यापेक्षा काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मैत्रिणींबद्दल प्रेम आहे. असंही असेल की या माणसांनी खूप प्रेम, आपलेपणा दिला, काही चांगल्या गोष्टी शिकवल्या; पण एक संपूर्ण अनुभव म्हणून शाळेकडून खूप खास मिळालं नाही. (याउलट इतर काही शैक्षणिक संस्थांमधे बहुतांशी अनुभव खूपच चांगला आला.)
शाळा म्हणजे ती एक बिल्डींग का? कारण जे कर्मचारी तेव्हा शाळेत होते त्यातले बरेचसे आता नाहीत. मग ही शाळा आणि ती शाळा एकच कशी? जसं माझ्यासाठी नवीन घर 'घर' राहिलं नाही, तसंच शाळेच्याही बाबतीत झालं आहे.

देशाच्या बाबतीत मात्र असं म्हणणं कठीण आहे. लहानपणापासून ज्या संस्थेत काम करण्याची स्वप्न पहात होते, त्यातल्या एका संस्थेत आज मी आहे. जगाला कौतुक वाटावं असं काही या संस्थेतल्या लोकांनी उभारलं आहे, आणि आज त्याची देखभाल करत आहेत, पुढेही करत रहातील. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे मला माझ्या देशाबद्दल अभिमान वाटतो ... माझ्या देशाने जगाला काहीतरी दिलं आहे.
मी जिथे जन्माला आले त्या जागेबद्दल मला प्रेम आहे. आणि सरतेशेवटी व्यावहारिक पातळीवर उतरलं तर बाकी कोणीही मला हाकलून देऊ शकेल, प्रवेश नाकारू शकेल पण माझा देश माझाच राहिल. शाळेच्या बाबतीत हे होणं कठीण आहे.

शाळेच्या बाबतीत जसं मला फार 'सुख' नाही, तसं काही दु:खही नाही. इतर कोणतीही शाळा असती तरीही माझं मत फारसं वेगळं झालं असतं असंही नाही. कदाचित हा माझाच दोष/गुण असेल.

मी मित्र-मैत्रिणींच्या बाबतीत खूप संवेदनशील, हळवी किंवा भावनाप्रधान आहे असं नाही, पण ऋणी मात्र जरूर आहे. या सगळ्यांमुळेच आत्तापर्यंत मला खूप चांगले दिवस बघता आले त्याबद्दल कृतज्ञता, बस्स!

Naniwadekar said...

संहिताबाई : देशातल्या लोकांनी जगाला काही दिल्याचं श्रेय देशाला मिळतं, तसं शाळेतल्या चांगल्या लोकांचं, चांगल्या अनुभवांचं श्रेय शाळेला का मिळू नये? मात्र मला स्वत:ला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. शाळेविषयी (कुठल्याही खराब आठवणी नसूनही) मला कधीच काडीचंही प्रेम वाटलं नाही. देशाविषयीही प्रेम वाटणं कमी होत चाललंय. पण ते पूर्ण कधीच नष्ट होणार नाही.

> माझा देश माझाच राहिल. शाळेच्या बाबतीत हे होणं कठीण आहे.
>---

आपला विद्यार्थी शाळेनी कायम विद्यार्थीच ठेवला किंवा ठेवू पाहिला तर शाळा बदनाम होईल, हो.
.

> मी मित्र-मैत्रिणी बदलले हे म्हणणं चुकीचं आहे
>
हे वाचल्यावर मी दचकलो, कारण मी असं काही बोललोच नव्हतो. तुम्ही ठाण्याहून शिक्षणासाठी बाहेर पडल्यात, मग मॅंचेस्टरज़वळ नोकरी केली असावी, मग तिथून दुसरीकडे; असे प्रसंगांमुळे 'मित्र बदलत राहिले' आणि ज़ुन्या मित्रांशी आपण कितपत संबंध ठेवतो याचा अनुभव वाढत गेला, एवढाच माझा रोख होता.

- डी एन

Followers