अजूनही अनेकांना 'टाईम्स' उघडल्यावर 'यू सेड इट' किंवा 'कसं बोललात' नाही याची जाणीव होत असेल. माझ्यासाठी लहानपणी 'काही विनोदी दिसणारी, म्हणून व्यंगचित्रं' एवढंच त्याचं महत्त्व होतं. राजकारण, समाजकारण वगैरे शब्दांचा अर्थ समजेपर्यंत लक्ष्मण यांनी सदर बंद केलं होतं. आणि त्यानंतरच पंडीत नेहरू, कृष्ण मेनन, इंदीरा गांधी, आणिबाणी, बोफोर्स तोफांचा, चारा, युरीया, घोटाळा वगैरे गोष्टी कळत गेल्या. माझ्या पिढीने खुला बाजार, मुक्त अर्थव्यवस्था वगैरे गोष्टी आधी अनुभवल्या आणि नंतर समजल्या. पण 'कसं बोललात?' पाहून 'कॉमन मॅन'चा चेहरा नक्कीच माहित होता. पुण्यातल्या लोकांना सिंबायसिस महाविद्यालयातला या 'कॉमन मॅन'चा पुतळाही माहित असेल आणि काही मोजक्या लोकांना 'प्राण जाये पर शान न जाये' या चित्रपटातला शेवटी अवतरणारा 'कॉमन मॅन'ही माहित असेल. पण तरीही माझ्या आणि पुढच्या पिढीला या महान व्यंगचित्रकाराची महती कळणं, उमगणं कठीण होतं.
हा कॉमन मॅन बोलत नाही, तो नुसतीच नजर टाकतो, रस्त्यातून चालताना कानावर पडणारे संवाद ऐकतो, गृहिणींनी केलेलं गॉसिपही ऐकतो, भाषणांना गर्दी करतो आणि मुख्य म्हणजे राजकारण्यांच्या दलदलीमधे फसतो. पण तरीही त्याच्या चेहेर्यावरचे भाव काहीसांगून जातात आणि त्यामुळे अनेकदा राजकारणी हादरले. पंडीत नेहरुंच्या काळातले 'अनिवासी भारतीय' कृष्ण मेनन, महाराष्ट्रात दारूबंदी करणारे मुंबई इलाक्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई, आणिबाणी लादणार्या इंदीरा गांधी, त्यांच्या प्रशंसेत खळ न पडू देणारे तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष देवकांत बारूआ, जनता पक्षातले अनेक स्वयंभू नेते आणि मुख्य विदूषक राजनारायण, बोफोर्स तोफांच्या व्यवहारात हात शेकलेले राजीव गांधी, युरिया घोटाळ्यात अडकलेले तत्कालिन पंतप्रधान नरसिंहराव, असे अनेक चेहेरे काही रेघोट्यांनी आर. के. लक्ष्मण यांनी दाखवले; पण टिकून राहिला तो हा सामान्य माणूस! व्यंगचित्रकाराचं काम असतं कोणा एका माणसाची बाजू न घेता सत्य सांगणं आणि ते ही कोपरखळ्या मारत! आणिबाणीच्या काळात जेव्हा अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घातला जात होता, तेव्हा तुरुंगात टाकण्याच्या धमक्या मिळत असतानाही लक्ष्मण यांनी खुद्द इंदिरा गांधींकडून शाबासकी मिळवली होती. कॉमन मॅनच्या समस्या त्याही काळात रोज 'टाईम्स'मधे येतच होत्या. चंद्रावर खड्डे आहेत म्हणजे तिथे रस्ते आहेत, याचाच अर्थ तिथे माणसंही आहेत हा विनोद आज आपण (आणि आम्ही खगोलाभ्यासकही) सहजच सांगतो, पण त्यातून व्यंग दाखवणारे लक्ष्मण कधीच सामान्यांचा आवाज बनले होते.
माझ्या आणि पुढच्याही पिढ्यांना या गोष्टी फक्त 'इतिहासा'च्या पुस्तकातूनच कळतील, पण अजित केळकरांच्या कॉमन मॅनने एका तासाच्या आत या गोष्टी दाखवल्या, सांगितल्या. अगदी १९६१ साली हे सदर सुरू झालं तेव्हापासून भारताचा राजकीय आणि काही सामाजिक इतिहास लक्ष्मण यांच्या कार्टून्सच्या आधाराने एका तासात जिवंत झाला. एक चित्र हजार शब्दांचं काम करतं असं म्हणतात, काही रेषांनी बनलेले चेहेरे आणि एखाददोन वाक्यांत टिप्पणी यांच्या सहाय्याने या असामान्य व्यंगचित्रकाराने गल्लीपासून दिल्ली हलवली. बॉम्बेचं मुंबई झालं म्हणून शहराची प्रगती झाली नाही, पण सामान्य मुंबईकराच्या वेदनामात्र टाईम्सच्या पहिल्या पानावर झळकल्या. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ प्रसिद्ध होणारं हे सदर, त्याची खासियत एका तासात संपूर्णपणे दाखवणं अशक्यकोटीतलं काम, पण जोगळेकर-केळकर यांनी निवडक घटनांवर आधारित व्यंगचित्रं निवडून हा संपूर्ण काळ जिवंत केला, आणि तोही एका कुणा पक्षाची, पंथाची, धर्माची बाजू न घेता, एका कॉमन मॅनच्या नजरेतून! भारताच्या राजकारणाबद्दल अगदी मोजकी माहीती असणार्या परदेशी लोकांनाही कॉमन मॅनने एक तास खिळवून ठेवलं.
यू ट्यूबवरची कार्यक्रमाची एक झलक.
नाव, गाव, धर्म, पंथ, जात नसलेला अतिसामान्य अवतारातला कॉमन मॅन आता बोलला. आणि बोलला ते आनंददायी नक्कीच नव्हतं. मोरारजी देसाईंना मुख्यमंत्रीपदी असतानाही या कॉमन मॅनचा आवाज बंद करता आला नव्हता, कारण घटनेनेचसर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. पण आज मात्र कॉमन मॅनला दु:ख आहे की विध्वंसक लोक, धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या नावाखाली आज अभिव्यक्ती चिरडून टाकण्याच्या गोष्टी करत आहेत, आणि दुर्दैवाने काही अंशी सफलही होत आहेत. सामान्य माणूस आज महागाई, दुष्काळ यांच्याबद्दल ऐकण्या-वाचण्याऐवजी आज देशात अंदाधुंदी माजवणार्या गोष्टी ऐकत आहे. चिमूटभर लोकं आपल्या सर्वांमधे असलेल्या या कॉमन मॅनला वेठीस धरून कॉमन मॅनच्या समस्या सोडवण्याऐवजी आपसांत झुंजवत आहेत. आता पुन्हा वेळ आहे सत्तांध लोकांना त्यांची जागा दाखवण्याची; पण कॉमन मॅनला भीती आहे ती पुन्हा एकदा भारतभूमीमधे हिंसाचार माजू नये. फ्रेंच आणि रश्यन लोकांनी आपापल्या देशांत सत्तांध लोकांविरुद्ध क्रांती केली होती आणि त्याची किंमत अशाच अनेक कॉमन मॅनच्या जीवनाने चुकवली होती. आपल्या भारतभूमीवर असा हिंसाचार माजू नये, असंख्य लोक त्यात बळी पडू नयेत अशीच या कलाकाराची इच्छा आहे. आणिबाणीनंतर इंदीरा गांधींना सत्तेवरून पायउतार करणार्या जनतेला पुन्हा एकदा आपल्या कर्तव्याची आठवण करून द्यायची आहे. आणि म्हणूनच कधीही न बोलणारा आर. के. लक्ष्मणांचा मानसपुत्र, जो आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून गेली अनेक वर्ष टाईम्सच्या पहिल्या पानावर आपल्या दिवसाची सुरूवात करून देत होता, तो 'कॉमन मॅन' बोलला.
अजित केळकर यांच्या वेबसाईटवर या एकपात्रीची कार्यक्रमाची माहिती आहे.
हेच पोस्ट मिसळपाववरही आहे.
1 comment:
उत्तम परीक्षण.
Post a Comment