Thursday, September 20, 2012

यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान - उत्तर अमेरिका खंडातला सर्वात मोठा ज्वालामुखी

महाराष्ट्रात ज्वालामुखी नवीन नाही. सह्याद्रीच्या रांगा ज्वालामुखीच्या उद्रेकातूनच तयार झालेल्या आहेत हे आपण शालेय भूगोलातच शिकलेलो आहोत. पण हा ज्वालामुखी आता मृत आहे. निदान गेली ६५ लाख वर्ष या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला नाही असं मानलं जातं. उत्तर अमेरिका खंडातला यलोस्टोन उद्यानात असणारा ज्वालामुखी अतिशय वेगळा दिसतो. हा ज्वालामुखी अजूनही जिवंत आहे असं समजलं जातं. अनेक ठिकाणी दिसणारा धूर, पाण्याची कारंजी आणि सल्फरचा वास ही याची लक्षणं आहेतच. शिवाय या भागात सतत भूकंपाचे हादरे बसतात. भूगर्भातल्या तापमानजन्य घडामोडींपैकी अर्ध्या घटना या Caldera मधे घडतात.

Caldera म्हणजे स्पॅनिश भाषेत कढई, अन्न शिजवण्याचं भांडं. यलोस्टोन उद्यानाच्या ठराविक भागात पृष्ठभागावर दिसणारं पाणी उकळतं असतं, काही ठिकाणी उष्ण चिखलाची पात्र दिसतात, तप्त लाव्हा पृष्ठभागापासून खाली काही किलोमीटर अंतरावरच आहे. या उष्णतेमुळे या भागाला Yellowston caldera / यलोस्टोनची कढई असं नाव दिलेलं आहे. पृथ्वीच्या पोटात चालणाऱ्या या जलौष्णिक घडामोडींमुळे पृष्ठभागावर आपल्याला वेगवेगळ्या घटना दिसतात, उदा: गरम पाण्याची कारंजी, ठराविक भागांमधून बाहेर पडणाऱ्या वाफा, रंगीत तलाव, उकळता चिखल इत्यादी. पृष्ठभागाखाली नक्की काय चालतं ते या पुढच्या कार्टूनवरून समजेल.

(फोटो यलोस्टोनमधेच घेतलेला आहे.)

जमिनीत काही किलोमीटर खाली तप्त लाव्हा आहे. यलोस्टोनच्या पठाराच्या पृष्ठभागाच्या फारच जवळ हा लाव्हा आहे. वर पाऊस आणि बर्फरूपात जे पाणी जमा होतं, ते जमिनीला असणाऱ्या भेगांमधून खाली झिरपतं. लाव्हाच्या वरच्या बाजूला अनेक ठिकाणी हे पाणी साचतं आणि लाव्हातल्या उष्णतेमुळे हे पाणी उकळतं. उकळल्यावर पाण्याचं आकारमान वाढून ते दगडांमधे जे नैसर्गिक पाईप्स आहेत त्यातून वर येतं. पृष्ठभागावर या पायपांचं तोंड किती रूंद आहे आणि आजूबाजूला दगड आहे का माती यावरून त्या ठिकाणी तळं होतं का कारंजं हे ठरतं. अनेक ठिकाणी जमिनीतून फक्त कार्बन डायॉक्साईड, सल्फर डायॉक्साईड, हायड्रोजन सल्फाईड* असे वायू वर येतात, ती असतात fumarole किंवा जमिनीखालची धुरांडी.

*हाच तो सडक्या अंड्यांचा वास असणारा वायू. यलोस्टोनच्या या भागात अनेक ठिकाणी सल्फर आणि हायड्रोजन सल्फाईडचा वास येत रहातो.

यलोस्टोनमधलं Old faithful नावाचं कारंजं सर्वाधिक प्रसिद्ध आहे. आणि त्याचं कारण आकार नसून नियमितता आहे. दर ८८ मिनीटांनी (सरासरी आकडा, ही रेंज ४४ ते १२५ मिनीटं आहे) हे कारंजं सुरू होतं. तीस-पस्तीस मीटर उंचीपर्यंत पाणी उडवतं आणि काही मिनीटांत पुन्हा तिथून वाफ, धूर यायला सुरूवात होते. इतर काही कारंज्यांमधून अन्यथा वाफ येतेच असं नाही, पण मुख्य म्हणजे Old faithful ची नियमितता या कारंज्यांकडे नाही. दिवसाउजेडी दर ९० मिनीटांनी Old faithful चा 'पिसारा' बघायला पर्यटकांची गर्दी जमा होते.

या भागातल्या अन्य कारंज्यांमधे Grotto geyser, Grand geyser, Giant Geyser  आणि Castle Geyser हे cone geysers आहेत. भूगर्भातून पाणी बाहेर येतं तेव्हा त्याबरोबर कॅल्सियम कार्बोनेट आणि इतर क्षारही येतात. पाणी वाहून फायरहोल नदीत मिसळतं पण क्षार तिथेच कारंज्याच्या मुखाशी जमा होतात. या ढिगाऱ्याची उंची प्रत्येक वेळी कारंजं उडल्यानंतर वाढत जाते; त्या उंचीवरून कारंजं किती जुनं आहे याचा अंदाज घेता येतो. हेच ते cone geyser. Old faithful च्या आजूबाजूला फार क्षार दिसत नाहीत, याचा अर्थ ते तुलनेने तरूण आहे. ग्रोटो आणि कास्टल कारंजी बरीच जुनी आहेत. (मोठे फोटो पहाण्यासाठी फोटोवर क्लिक करा.)



















Old faithful - शांत असतानाOld faithful - सुरू होताना
Old faithful - पूर्ण 'पिसारा' Old faithful चा 'पिसारा' बघायला जमलेले पर्यटक
तात्पुरतं बंद होत आलेलं कारंजं आणि बाजूचे क्षारअचानक सुरू झालेलं कारंजं आणि पर्यटक
Giant geyser - जाने २०१० नंतर एकदाही उडलेलं नाहीGrotto geyser - शांत असताना दिसणारी क्षारांची रचना
नेमका परतीच्या वाटेवर ग्रोटो कारंजं सुरू झालं मुख्य कोन आणि आजूबाजूने होणारा वर्षाव
मागची कारंजी शांत होताना ग्रोटो
ग्रोटोच्या जोडीने ग्रँडही सुरू होतो Norris या सर्वात अशांत भागातला आणि उंचीने सर्वात मोठा पण अतिशय अनियमित Steamboat geyser
आणि हा सर्वात जुना समजला जाणारा Castle geyser चा कोनत्या भागातलं सामान्य दृष्यः धूर, गवत, झाडं, रंग आणि पर्यटक
 
Norris भागाचा पॅनोरामातिथलंच एक कारंजं आणि गरम पाण्याची तळी


उद्यानाच्या नैऋत्येला असणाऱ्या Old faithful आणि पश्चिमेच्या Norris भागात अशी कारंजी दिसतात. तर वायव्येच्या Mammoth hot spring भागात अतिशय कमी पाणी आणि कमी वेगाने वहाणारे झरे दिसतात. पाण्याचा वेग कमी असल्यामुळे तिथे क्षारांचा संचय वेगाने होतो आणि काही वेगळ्या प्रकारच्या रचना दिसतात.






लाईमस्टोनचा केशरी ढिगारा
तोच तो ढिगारा किंवा Orange mound
संथ प्रवाहामुळे तयार झालेल्या इतर रचना


साधारण अंडाकृती आकार असणाऱ्या यलोस्टोन कढईच्या आग्नेय भागात चिखलात दिसणाऱ्या रचना आहेत. याला mud pots आणि sulphur caldron अशी अनुक्रमे नावं आहेत. या भागातही हायड्रोजन सल्फाईचा सडका आणि सल्फरचा वास येत रहातो. अगदी उकळत्या चिखल आणि सल्फरच्या बाजूलाही गवत आणि झाडं दिसतात. त्यांचे काही फोटो:







सल्फरची किटली ड्रॅगनचं तोंड - फार आवाज करत वाफ बाहेर टाकतं
जमिनीतलं धुरांडं चिखलाच्या तळ्याशेजारचा सल्फर
उकळता चिखल सल्फर आणि उष्णतेमुळे मेलेली झाडं.


प्रचंड घडामोडी आत्तापर्यंत पाहिलेल्या फोटोंमधे दिसल्या तरी सर्वात सुंदर आहेत ते गरम पाण्याचे झरे. पृष्ठभागावर असणाऱ्या खळग्यांमधे खालून गरम पाण्याचा प्रवाह येऊन हे झरे किंवा तळी तयार होतात. या खळग्यांच्या कडेला असणाऱ्या उथळ भागात उष्णताप्रेमी जीवाणूंच्या वसाहती असतात. झऱ्यांचं सौंदर्य खुलतं ते या जीवाणूंमुळेच. लुटा लुत्फ नैसर्गिक रंगांचा:










या भागातलं पाणी बॅटरी अ‍ॅसिडपेक्षा किंचित कमी पण भयंकर अ‍ॅसिडीक आहे. सगळीकडे लाकडी पट्ट्यांचे बोर्डवॉक्स आहेत. 
Beauty parlour pool Morning glory- प्रत्यक्षात याचे रंग सातपटीने अधिक चांगले दिसतात.
Crested pool - सर्वात तप्त
नॉरीस भागातलं एक तळं Grand Prismatic या सर्वात प्रसिद्ध झऱ्याचा परिसर आणि फायरहोल नदी


आमच्या दृष्टीने हे खरं यलोस्टोन उद्यान. हे सगळं दीड दिवस पाहून शेवटी कंटाळा आला, चालून, उभं राहून पाय दुखायला लागले आणि सल्फरमुळे घशात खवखवही झाली. चालताना एखाद्या तळ्याच्या दिशेने वारा आपल्याकडे आला की तात्पुरत्या उष्णतेने बरं वाटायचं पण हातही नाकाकडे जात होता. अशा प्रकारचे निसर्गाची रूपं अन्यत्र फार ठिकाणी दिसत नाहीत. आणि आज यलोस्टोन जसं दिसलं तसं उद्या दिसेल याची खात्री नाही. यलोस्टोनचं पठार भूगर्भीय घडामोडींमुळे अतिशय अशांत आहे. तिथे दररोज भूकंपाचे हादरे बसतात (त्यातले बरेचसे जाणवत नाहीत). याचं मुख्य कारण plate tectonics, भूखंडांच्या हालचाली. यलोस्टोनमधे Continental Divide आहे. या सर्व घडामोडींमुळे अमेरिकेच्या या भागात ज्वालामुखी आहे, रॉकी पर्वत आहे, लाल रंगाचे दगड मधेच वर आलेले आहेत.

पण यलोस्टोन उद्यान म्हणजे फक्त भूगर्भीय घडामोडींचं दर्शन एवढंच नाही. यलोस्टोनमधे बायसन, एल्क असे जंगली प्राणी दिसले, मोठ्ठा यलोस्टोन तलाव आहे, यलोस्टोन, फायरहोल, गिबन या नद्या आहेत, त्यांची कुरणं आणि धबधबेही आहेत आणि ज्यामुळे या भागाला फ्रेंचांनी Roche Jaune आणि पुढे इंग्लिशमधे यलोस्टोन असं नाव मिळालं तो यलोस्टोन नदीवरचा "ग्रँड कॅन्यन"ही आहे. त्याचे फोटो (बँडविड्थ खपली नाही, संस्थळ आणि वाचक झोपले नाही तर) पुढच्या भागात.

पूर्वप्रकाशन: ऐसी अक्षरे http://www.aisiakshare.com/node/1227

No comments:

Followers