Tuesday, July 3, 2012

स्त्रीवादाचा पुरस्कार आणि आजचे "आपण"

स्वतः कमावायला लागल्यापाहून काही दिवसांतच ज्या गोष्टीचं महत्त्व समजलं ती म्हणजे स्त्रीवाद. पुरूषी मानसिकतेतून कधी माझ्यावर अन्याय झाला तर कधी माझ्या आईवर तर कधी माझ्या मैत्रिणीवर. छोट्या मोठ्या कृतीमधूनही, अन्याय करणार्‍यालाही अन्याय करतो आहोत याची आणि जिच्यावर अन्याय होतो आहे तिलाही अन्यायाची जाणीव नसणं हे चांगलं का वाईट असाही प्रश्न अनेकदा पडतो. अशा अनेक घटना आसपास पहाताना स्त्रीवादी कार्यकर्ती, लायबेरीयाची राष्ट्राध्यक्षा एलन जॉनसन सरलीफ हिला शांतता-नोबेल पुरस्कार मिळाला ही माझ्यासारख्या सामान्य स्त्रीसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट. सरलीफ यांच्याजोडीला स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणार्‍या लायबेरीयाच्याच लेय्मा ग्बोवी आणि येमेनमधले लोकशाहीवादी कार्यकर्त्या तवक्कुल कारमन यांना पुरस्कार मिळाला. समानतेसाठी झगडा मांडणार्‍या तिघींचा नोबेल पारितोषिकाने सन्मान व्हावा या बातमीनेच समानतेच्या तत्त्वावर विश्वास ठेवणार्‍या सर्व स्त्री-पुरूषांना आनंद व्हावा. दिवसाची सुरूवात व्हावी तर अशी!

आजूबाजूला पहावं तर काय दिसतं? लग्न झाल्यानंतर अनेक स्त्रिया राजीखुशीने आपलं नाव बदलतात. नाव असो वा आडनाव, गेली अनेक वर्ष आपली जी ओळख आहे तीच बदलायची, एवढं की फेसबुकावर फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर फोटो पाहिल्याशिवाय आपली बालमैत्रीण ओळखता येऊ नये ही अतिशय दु:खद गोष्ट वाटते. "मुली, चालून दाखव" "गाणं म्हण" वगैरे गोष्टी थिल्लर वाटतातच पण आजही भारतात अनेक समाजांत ही पद्धत सुरू आहे. आपल्याच वयाच्या मुलींना अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं हे समजल्यावर त्यातलं क्रौर्य जास्तच चांगलं समजलं. स्त्रियांवर होणार्‍या अन्यायांची यादी बनवायची तर त्याला अंत नाही; पण मला हा मुद्दा आज फार महत्त्वाचा वाटत नाही.

स्वातंत्र्याबरोबरच येते ती जबाबदारी. आपण आपलं स्वतंत्र अस्तित्त्व मिळवायचं तर त्याबरोबर येणार्‍या जबाबदारीची जाणीव आजच्या स्त्रियांमधे कितपत आहे? पुरूषाच्या शरीरात स्त्रीच्या शरीरापेक्षा जास्त स्नायू असल्यामुळे शारीरिक क्षमतेमधे स्त्रियांपेक्षा पुरूष वरचढ ठरतो यात वाद नाही. भरलेला सिलेंडर सामान्य स्त्री आपल्या घरात ट्रॉली वापरून फिरवू शकते, पण कदाचित चार पायर्‍या चढून लिफ्टमधे ठेवणं तिला शक्य नाही. असे काही क्षुल्लक अपवाद वगळता आज वरपांगी मुक्त दिसणार्‍या स्त्रियाही आपली जबाबदारी ओळखून आहेत का? घरातली कामं करण्यात पुरूषाने हातभार लावावा हे जेवढं खरं आहे तेवढंच घरातल्या सुतारकाम, माळीकामात स्त्रीनेही मदत करावी ही जबाबदारीची जाणीव आहे. घर चालवण्याची जबाबदारी पूर्वीच्या परंपरेत पुरूषावर होती, पण जर पुरूषी मानसिकतेचा विरोध करायचा असेल तर घर चालवण्याची जबाबदारी स्त्री आणि पुरूष दोघांची आहे याचीही जाणीव स्त्रीला हवी. लग्नानंतर नाव बदलायचं नसेल तर आपण स्त्री असण्याचे फायदे मिळत असतानाही ठोकरण्याची कर्तबगारी स्त्रीमधे असावी. "माझ्यावर अन्याय झाला आहे" असा फक्त ओ-रडा करण्यापेक्षा तो अन्याय कमी, नष्ट कसा होईल याचा प्रयत्न करणं हे अतिशय सकारात्मक पाऊल उचलल्याशिवाय बदल होणे शक्य नाही. नावडती गोष्ट घडल्यास रडणं हा मानवी स्वभावच आहे, पण आपल्या रडण्यामुळे नको त्या ठिकाणी आपल्याला सहानुभूती मिळते ती गमावण्याची स्त्रीची तयारी असावी.

पारंपारिक मनस्थितीच्या सर्व स्त्री-पुरूषांना स्वतंत्र अस्तित्त्व असणारी स्त्री अनेक पैलूंमुळे स्त्री वाटतच नाही. १९४० च्या दशकात सिमोन दी बोव्वार हिने Le deuxième sexe (द सेकंड सेक्स) लिहीताना जी तक्रार केली ती आज आपल्या समाजातही दिसतेच; स्वतंत्र विचारांची, बुद्धीची व्यक्ती स्त्री असूच शकत नाही इथपर्यंत आरोप होतात. नवीन विचारांचा, मूल्यांचा अभ्यास करून, तर्काच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पहाणार्‍या पुरूषाला समाजात जेवढा त्रास होतो त्यापेक्षा किंचित जास्त त्रास स्त्रियांना होतो. एक स्त्री शिकली की सर्व कुटुंब शिकतं असं म्हणतात; या जबाबदारीतून आजही स्त्रीची मुक्तता नाहीच. पण 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' आणि या यातना सहन करूनही आपल्या समानतेच्या मूल्यांवर विश्वास ठेवण्याची शक्ती प्रत्येक स्त्री-पुरूषांत असावी.

यासंदर्भात काही रोचक चर्चा.

No comments:

Followers