अलिकडेच वाचलेल्या एका संशोधनानुसार गुरूत्वाकर्षण हे खरे बल नसून ते सर्वव्यापी परमेश्वराने निर्माण केलेले कर्मविपाकामुळे होणारे अधःपतन असते. शाळांमधे भौतिकशास्त्र, उत्क्रांती, अणूरासायनिक प्रक्रिया इत्यादी पाश्चात्य विज्ञान शिकवावे का नाही यावरून चर्चा सुरू असताना, कांदा संस्थानाच्या माजी संस्थानिकांच्या देणगीतून सुरू असणार्या संशोधनसंस्थेतील पदार्थविज्ञानिक आचार्य दीपांकर भिर्टाचारजी यांनी त्यांच्या या नव्या 'कर्मविपाकामुळे अधःपतन' या संशोधनाची माहिती दिली. संस्थानातील विद्यापीठातच प्रौद्योगिकी भौतिकशास्त्र आणि शिक्षण या विषयांतून विद्यावाचस्पती या पदवीसाठी संशोधन करून आता तिथेच प्राध्यापक पदाचा भार सांभाळत तीन विद्यार्थ्यांना संशोधनात मार्गदर्शन करणार्या आचार्यांना या विषयावर अधिक बोलण्याचा वेळ देण्यात आला. आचार्यांच्या मते, "पतन होणे हे नैसर्गिकच वाटते, यात गुरूत्वाकर्षणाचा हात असावा असे वरकरणी वाटते, पण ते तसे नसून कर्मविपाकाचा जो सुंदर डाव भगवंताने मांडला आहे त्यामुळे होते. भगवंताच्या इच्छेवरून आपापल्या कर्मानुसार वस्तूंचे अधःपतन होते. गुरूत्वाकर्षणाचा नियम आपण शिकतो, पण त्याचे आकलन साकल्याने झालेले नसून त्यात अनेक त्रुटी आहेत. दोन वस्तूंमधे आकर्षण असणारे बल किती असते याचे गणित गुरूत्वाकर्षणाने मांडले आहे, परंतू हे बल येते कुठून याचे उत्तर गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत देऊ शकत नाही. खुद्द गुरू न्यूटन यांच्या वदनाचा तरजुमा असा, "मला अशी शंका आहे की माझे सर्व सिद्धांत अशा बलावर अवलंबून आहे ज्याचा शोध तत्त्वज्ञ गेली कितीक वर्षे घेत आहेत, पण त्यात त्यांना यश आलेले नाही." अर्थातच गुरू न्यूटन एका वरच्या तत्त्वाकडे, शक्तीकडे निर्देश करत आहेत. आपण पाश्चात्यांचं सरसकट अंधानुकरण करतो आहोत पण आपल्या शास्त्रांमधे निसर्गाच्या गूढरम्य विस्ताराचे आकलन मांडून ठेवले आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. उद्या कोणी हेक्टर हिल्टन जर आपली शास्त्र कशी महान आहेत असं सांगायला लागला तरच आपण आपल्या शास्त्रांना मान देऊ अशी आपली आजची शिक्षक पिढी आहे. त्यांच्यामुळे तरूणांचाही बुद्धीनाश होत असल्यामुळे हे सर्व अधःपतन थांबवण्याची जबाबदारी आपलीच आहे."
या बातमीमुळे मी आचार्यांच्या संस्थेस भेट देण्याचे ठरवले. १८५७ च्या बंडानंतर ज्ञानेश्वरांनंतर भारतीय संस्कृतीचा र्हास का झाला याचे संशोधन करण्यासाठी त्याच वर्षी सुरू झालेल्या महाराजाधिराज सोमशेखरनाथ संस्था, मसोसं, इथे स्थापनेपासूनच कर्मविपाक सिद्धांताचा अभ्यास आणि त्यानुसार विज्ञानाची आपल्या जुन्या शास्त्रानुसार संगतवार पुनर्मांडणी हे दोन विषय महत्वाचे समजले जातात. त्याशिवाय मसोसंमधे इतरही काही महत्त्वपूर्ण विषयांवर संशोधन होते; तिथल्या ग्रंथालयात दिसणार्या काही प्रबंधांच्या शीर्षकांवरून तिथल्या संशोधनाचा आवाका लक्षात येईल. उदाहरणार्थ झेंड्याचा आकार त्रिकोणी असण्याचा पृथ्वीच्या आकाराशी असणारा संबंध, न्यूटनच्या तिसर्या नियमांचा पुनर्जन्म आणि कर्मफलाशी असणारा अन्योन्यान्वय, केप्लरच्या पहिल्या नियमाचे मूळ भारतीयांनी शोधलेल्या शून्यात, इ. ग्रंथालयात फिरताना तिथल्या एक विद्यार्थिनी श्रीमती रतीचंद्रिकादेवी म. बाणकोटे यांच्याकडून त्यांच्या कामाची माहिती मिळाली. श्रीमती रतीचंद्रिकादेवी या आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यावाचस्पतीपदाच्या प्रबंधासाठी संशोधन करत आहेत. त्यांचा विषय हा त्यांच्या पूर्वसूरींनी केलेल्या संशोधनावर आधारित आहे. त्यांच्या संशोधनाचा सारांश असा, "न्यूटनचा पहिला नियम म्हणजेच अनंत काळ आणि जन्मोजन्मीचे फेरा ही कल्पना आहे. आमच्या पूर्वजांनी अनेक सहस्रकांपूर्वीच हा शोध लावला होता, आणि आता कुठे या पाश्चात्यांना त्याची माहिती समजली. हळदीचं पेटंट या पाश्चात्य लोकांनी चोरण्याचा प्रयत्न केला, हा ही तसलाच प्रकार आहे." त्यांच्याकडूनच समजलेले न्यूटनच्या नियमांचे भारतीय मूळ हे असे,
"भगवंताचा पहिला नियम असा देवाच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट बदलत नाही. देवाच्या हस्तक्षेपाशिवाय आपण सर्वच जन्ममृत्युच्या फेर्यातून जात रहाणार. तुम्ही जड वस्तूंचे नियम तेवढे पहाता, त्यात खूप गूढ गहन अर्थ दडलेला आहे. दुसरा नियम असं म्हणतो, आपले वस्तूमान 'व' आणि देवाची भक्ती करण्याचे त्वरण 'त' असेल तर भल्याकडे जाण्याचे आपले बल असेल 'तव'. अर्थात हा नियम एवढा सोपा नाही, त्याचे संपूर्ण विवरण 'खासशोध' या आचार्यांच्या ग्रंथात दिलेले आहे. आणि तिसरा नियमतर न्यूटनने शब्दाचीही अदलाबदल न करता तसाच उचलला आहे. कर्मविपाकाची आणखी वेगळी सिद्धता काय द्यावी? ही एक बाजू झाली. न्यूटनचा पाश्चात्यांना प्रचंड अभिमान वाटतो. पण न्यूटनच्या आधी कितीक सहस्रके हिंदुस्थानात गुरूत्वीय स्थिरांकाचा शोध लागला होता. हा स्थिरांक, जी, ८४ लक्ष, जेवढ्या योनी आहेत असं समजलं जातं, गुणिले हिंदू वर्षातले दिवस गुणिले आर्यभटाने आखलेल्या त्रिकोणी पृथ्वीला मंडल असणार्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच आज आधुनिक लोक ज्याला पृथ्वीची त्रिज्या म्हणतात, त्याचा व्यस्त आहे." पाश्चात्यांच्या नावाला आज वलय आहे आणि आम्हाला नोकरी देताना मात्र कोणी विचारत नाही ही खंत त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.
आचार्यांच्या निवेदनानुसार हे नवीनतम संशोधन 'डॉग्मॅटीक अॅनल्स ऑफ सोसायटी ऑफ इंडीया' (दासी) आणि तरूणाईचे आवडते नियतकालिक 'भगवंताचे सृष्टीनियमन' या दोन्ही ठिकाणी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. या संशोधनांनुसार, ज्या इतर अनेक घटना फक्त गुरूत्वाकर्षणातून समजावता येत नाहीत त्या समजून घेता येतात. या प्रश्नांपैकी काही म्हणजे मृत्युनंतर माणूस 'वर जातो' ते कसे, स्वर्गाची जागा वरच्या आणि नरकाची जागा खालच्या दिशेला का असते, अवकाशातून पुष्पवृष्टी होताना फुलांना हवेचा रोध का जाणवत नाही तसेच फुलांच्या उल्का का होत नाहीत.
मसोसं आणि आचार्य यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा संस्थानातील तरूण विद्यार्थी आणि खुद्द संस्थानिक, महाराज सोमशेखरनाथ यांचे वारस आणि मसोसंचे महागुरू महाचार्य महाराज नीलेंद्रप्रताप यादव हे लवकरच पंतप्रधानांकडे एक निवेदन देणार आहेत. या निवेदनात भारतातील सर्व शाळांमधे या कर्मविपाक पतनाचा सिद्धांत शिकवावा अशी विनंती असेल. विनंती अमान्य झाल्यास खुद्द महाराजांचे दिवाण हरदासशास्त्री हे "मी दिवाण" असे लिहीलेले सोवळे नेसून उपोषणास बसणार आहेत, असेही आचार्यांनी जाहीर केले. "आम्हाला मुलांच्या हितामधेच रस आहे" असे आचार्यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
प्रेरणा
सदर संशोधनपर लेख वाचून, त्याचे आकलन करून तो इथे लिहीण्यात मला सर्वश्री राजेश घासकडवी, नंदन, Nile आणि सर्वसाध्वी प्रियाली आणि ढब्बू पैसा यांची मदत झाली त्यांचे आभार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment