"Dr Strangelove: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb" असं नाव असणार्या चित्रपटाबद्दल प्रचंड कुतूहल पोस्टर बघूनच निर्माण झालं. सबटायटल्सशिवाय समजणारा हा चित्रपट अशी एक टुकार ओळख मी करून देऊ शकते. चित्रपटाची गोष्ट विकिपीडीयावर, आयएम्डीबीवर आहे तर मी ती ही सांगत नाही. या चित्रपटाची गोष्ट सांगण्यापेक्षा त्यातल्या छोट्याश्याच विनोदी गोष्टी सांगून चित्रपट बघण्यासाठी वाचकांना उद्युक्त करावं असा माझा विचार आहे. फक्त त्यासाठी चार ओळींची पार्श्वभूमी: शीतयुद्धाच्या काळात हा चित्रपट घडतो. रश्या आणि अमेरिकेची शस्त्रास्त्र स्पर्धा, अंतराळ स्पर्धा आणि शांतीस्पर्धाही जोरदार सुरू आहे. एक म्याड अमेरिकन ब्रिगेडीयर जनरल रिपर, रश्याच्या आण्विक भट्ट्यांवर हल्ला करण्याचा फतवा काढतो. बराचसा चित्रपट अमेरिकेत घडलेला दाखवला आहे.
- दोघांचं भांडण सोडवण्यासाठी तिसरा त्यांना ओरडतो, "Gentlemen, you can't fight in here! This is the War Room!"
- डॉ. स्ट्रेंजलव्ह अमेरिकन राष्ट्राध्यक्षाही संबोधताना दोनदा 'माय फ्यूरर' असं म्हणतो आणि स्वतःची चूक सुधारत 'द प्रेसिडंट' म्हणतो. त्याचा एक हात नाझी झालेला असतो. दुसर्या हाताने तो हा नाझी हात सतत दाबायचा प्रयत्न करत असतो. पीटर सेलर्सचा डॉ. स्ट्रेंजलव्ह झबरदस्तच आहे.
- पीटर सेलर्सच्या एकूण तीन भूमिका या चित्रपटात आहेत. त्याने रंगवलेला ब्रिटीश आर्मीतला 'एक्सचेंज ऑफिसर' मँड्रेकही तेवढाच मजेशीर आहे. आपला बॉस रिपर याने विमानं मागे बोलवावीत यासाठी सदैव त्याचे क्षीण प्रयत्न सुरू असतात
- मँड्रेकला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला लवकरात लवकर फोन करून कोड सांगायचा असतो. इतर सर्व फोन लाईन तुटल्यावर तो पे-फोनचा वापर करतो. खिशातली नाणी संपत आली म्हणून तो अमेरिकन ऑफिसरला कोकाकोलाच्या मशीनवर गोळी घालून नाणी काढायला सांगतो. त्या ऑफिसरने मँड्रेकला "राष्ट्राध्यक्षाला तुझ्याशी बोलायचं नसेल तर कोका कोला कंपनी तुझ्यावर नुकसानीचा दावा गुदरेल" अशी धमकी देणं 'प्रसंगानुरूप'च म्हणायचं.
- टर्जीड्सन हा कडवा राष्ट्रवादी जनरल शांतताप्रेमी राष्ट्राध्यक्षाला सतत उचकवण्याचा प्रयत्न करत असतो. जेणेकरून रश्यावर आता एवीतेवी हल्लाबोल केलेला आहे तर मग आणखी बॉम्ज टाकू या. त्याचे संवाद इथे देण्यात अर्थ नाही आणि जॉर्ज स्कॉटच्या हावभाव, देहबोली, अभिनयाबद्दल लिहीणं अशक्य आहे.
- अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि (ऐकू न येणारा) रशियन प्रीमीयर यांच्यातले सगळेच फोन-संवाद (का मोनोलॉग्ज?) हहपुवा आहेत. अमेरिका आणि रश्याने एकत्र येऊन अमेरिकन विमानांनी रश्यावर हल्ला करू नये याची उपाययोजना करताना अमेरिकेने आपल्या विमानांचं गंतव्य स्थान रश्याला सांगणं हा त्यातलाच एक महान प्रकार.
- एअरफोर्स पायलट्सना 'इमर्जन्सी'साठी जो किट दिलेला असतो त्याची यादी वाचली जाते. प्रत्यक्षात काय दिलं जातं याची मला कल्पना नाही. तो भयंकर मोठा विनोद आहे; त्यावर तो वाचणाराच म्हणतो, "एवढ्या सामुग्रीवर व्हेगासमधे चिक्कार मजा करता येईल."
- शेवटी काही ठराविक लोकांनी खोल खाणीत जाऊन लपावं असं डॉ. स्ट्रेंजलव्हच्या सूचनेवरून ठरतं. मानवजात वाचवण्यासाठी खाणीत रहाणार्या पुरूषांना एक-स्त्री-व्रत तोडावं लागेल काय असा प्रश्न अमेरिकन टर्जीड्सनला पडतो. मूळचा जर्मन, नाझी डॉ. स्ट्रेंजलव्ह त्याला 'खेदाने' होकार देतो. आणि या सर्व कल्पनेला उचलून धरतो तो रश्यन राजदूत, " I must confess, you have an astonishingly good idea there, Doctor."
१९६४ साली "डॉ. स्ट्रेंजलव्ह" आला. चित्रपट संपूर्णतः कृष्ण-धवल आहे. दृष्टीसुख म्हणावं तर फारसं काही नाही; विमानांचे शॉट्सही अगदी साधे आहेत. पण हा चित्रपट त्याहीपेक्षा वरच्या स्तराचा आहे, ज्याचं वर्णन इंग्लिशमधे सेरेब्रल मूव्ही असं करतात. आर्मी शिस्तबद्ध ऑफिसर्स असले तरीही ती माणसंच असतत, आपले हेवेदावे, आपले विचार, आपलं युद्धखोर तत्त्वज्ञान तत्वज्ञान इतरांवर लादून ते सर्वनाशही घडवून आणू शकतात. शांतताप्रेमी युद्धविरोधक अशा माणसांच्या हाताखाली असूदेत वा देशाचा सर्वेसर्वा युद्धखोरांमुळे होणारं नुकसान टाळता येत नाही. आपला अजेंडा पुढे रेमटवण्यासाठी पोकळ तत्वज्ञानाच्या बढाया मारणारा रिपर आणि विरोधकांना नेस्तनाबूत करण्याच्या गफ्फा हाणताना विरोधकांच्या बुद्धी-शक्तीला कमी लेखून सर्वच जगावर संकट आणणारा टर्जीड्सन या वृत्ती प्रत्यक्ष आणि आभासी जगातही दिसून येतात. त्यांचा तोंडावर विरोधक दिसणारा रश्यन राजदूतही त्यांच्याच कंपूत सामील होणारा निघतो आणि "कोणत्याही प्रकारे आपण आधी विध्वंस करायचा नाही" असं म्हणणारा राष्ट्रध्यक्ष असूनही हतबल होतो.
स्वतःवरच हसणार्या, विनोद करणार्या, भडक उजव्या विचारसरणीच्या रिपर आणि टर्जीड्सनला बराचसा हास्यास्पद आणि थोडासा खुनशी दाखवणारा, आपल्या देशाच्या न पटणार्या पॉलिश्यांवर विनोदी, विसंवादी पद्धतीने टीका करणारा स्टानली कुब्रिक आणि त्याचा "डॉ. स्ट्रेंजलव्ह" आवडला नाही तरच नवल.
No comments:
Post a Comment