दर वेळी असंच होतं, जी.एम.आर.टी.ला जायचं असलं की मी कुरकूर करायला सुरूवात करते. "कशाला जायचं तिथे?", "त्रास आहे रे, उद्या ग्मर्टला जायचं आहे. सक्काळी सक्काळी उठून तिकडे जायचं, तिकडचं जेवणही मला आवडत नाही." असं काही नेहेमीच होतं. पण आलिया भोगासी म्हणून सकाळी सहाचा गजर लावून सव्वासहापर्यंत मी उठते. अर्धवट झोपेत, आवश्यक अशा अर्ध्या महत्त्वाच्या गोष्टी घरात किंवा ऑफिसातच विसरून मी बसमधे बसते आणि बस सुटायच्या आधीच माझा डोळा लागतो.
जाग येते तर बस बहुदा ऑफिसाच्या गेटपाशी असते आणि पुन्हा डोळा उघडतो तर इंद्रायणी जवळ आलेली दिसते. श्वासात बराच जास्त ऑक्सिजन आहे हे जाणवतं आणि खूप छान वाटतं. चाकण आल्याची चाहूल लागते आणि मला सगळ्यात पहिले आठवतात ते चाकणचा भुईकोट किल्ला आणि फिरंगोजी नरसाळा. हा किल्ला बघण्याचा प्रयत्न मी अजूनही केला नाही आहे, पण तरीही ठाण्याचा किल्ला(/तुरूंग) बाहेरून पाहिलेला आहे त्याची आठवण होते. पण त्याहीपेक्षा जास्त आठवतो तो फिरंगोजी नरसाळाच; तो कसा दिसत असेल कोण जाणे, पण त्याच्यासारख्या वीरांमुळे आज माझं आयुष्य चांगलं झालं आहे याची जाणीव होते, मी दगड नाही, मलाही भावना आहेत याची किंचित कल्पना येते. बस तशीच पुढे जात असतेच आणि विचारांमधून बाहेर येईपर्यंत भामा येते. या भामेच्या तीरावरच्या भाममधे मी एकदा मिसळ खाल्ली होती. जी.एम.आर.टी.च्या स्टाफमधल्या एक इंजिनीयर आहेत, त्यांनी आपुलकीने मला मिसळ खायला लावली होती, तेव्हापासून आमची मैत्री झाली ती झाली. भामा ओलांडली की लगेच एक सुंदर, सुशोभित कँपस दिसतो, ही आहे कांदा-लसणीवर संशोधन करणारी संस्था! लगेचच भीमेवरचा पूल दिसतो आणि येतं राजगुरूनगर ... खेड! कोवळ्या वयात देशासाठी जीवाची आहुती देणार्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरुंपैकी, राजगुरूंचं गाव! त्यांच्या नावाचं कॉलेज दिसतं, एस.टी. स्टँडबाहेरचा त्यांचा पुतळा दिसतो आणि वाटतं, किती फालतू गोष्टींचा आपण मोठा इश्यू बनवतो. कोवळ्या वयात फाशी गेलेल्या राजगुरूंबद्दलचा आदर दरवेळी वाढतच जातो. आणि समोर दिसतो एक बकाल नाला आणि एक देशी दारूचा गुत्ता ... संताप होतो, पण आपण काही करू शकत नाही याची जाणीव जास्त टोचते.
पण हे सह्याद्रीचं सौंदर्य असं आहे की सगळं विसरायला होतं. पुणे-नाशिक रस्त्यावर आधी खेडची घाटी लागते. रस्त्यावरची वळणं, आडदांड सह्याद्री आणि त्याच्या कुशीतला पाझर तलाव कितीही वेळा पाहिला तरी समाधान होतंच नाही. पुढे एक अवसरीची घाटीही येते, आणि तिथली झाडं पाहून सरळ बसमधून उडी मारावी आणि झाडाखाली शांत बसावं, थोडा विचार करावा, थोडं काम करावं, थोडं भटकावं आणि दमून एखाद्या झाडाखालीच पसरावं अशी इच्छा वारंवार होते. मग मात्र मी घाबरून गाणं कोणतं सुरू आहे वगैरे विचार करते. उगाच उडी-बिडी मारली तर, अशा वेळी माझा स्वतःवरच विश्वास नसतो. या सगळ्या घाट्यांमधे मला आवडतो तो चंदनापुरीचा घाट! अरेरे, जी.एम.आर.टी.साठी त्याच्या आधीच वळतो. एकदाच हा घाट पाहिला, पण राकट सौंदर्य म्हणजे काय तर आता मला चंदनापुरीचा घाटच आठवतो. नाशिक रस्त्याला आळेफाटा मागे टाकून संगमनेरकडे गेलं की हा घाट मधे येतो. एखादा नाकी-डोळी नीटस, सावळासा तरूण, जो शारिरीक श्रमाच्या कामांमुळे आखीव-रेखीव आहे, आणि मुळचा गव्हाळ वर्ण आता उन्हामुळे रापून तांबूस-सावळा झाला आहे, असं काहीसं या घाटाकडे पाहून मला वाटलं. हा घाट 'आवडला'... अगदी तस्सा आवडला. आधी खेड घाट मला आवडायचा, पण चंदनापुरीचा घाट पाहून ते आवडणं वेगळं आणि हे वेगळं असं काहीसं वाटतं. खेड घाटातलं सौंदर्य वेगळं आणि चंदनापुरीचं वेगळं. आणि हे चंदनापुरी नावसुद्धा मला एवढं आवडतं की हा आखीव-रेखीव तरूण अचानक बसून गणित, भौतिकशास्त्र किंवा अर्थशास्त्रावर गप्पा मारतोय असं वाटतं. एखादं ठिकाण नुस्तंच आवडतं असं नाही तर त्याची मोहिनी पडते तसं माझ्या बाबतीत चंदनापुरीचं झालं असावं ... नुस्तंच डोक्यात शब्द घुमत रहातो चंदनापुरी, चंदनापुरी, चंदनापुरी ....
पण पुन्हा पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसतं, घोड नदी आलेली असते. रस्त्यात 'खवय्येगिरी', वगैरे एकदम पॉश रेस्तराँ दिसतात. मला 'खवय्येगिरी'मधले स्नॅक्स आवडलेही, पण ते थोडे विजोड वाटतात. मंचर सोडलं की एकलहर्याच्या दिशेला ही खादाडी-गृह आहेत. मंचर बर्यापैकी आधुनिक गाव वाटतंही, पण मला मात्र एकलहरे आणि कळंबमधली छोटेखानी पण सात्विक अशी कौलारू घरं जास्त आवडतात. सारवलेलं खळं, समोर एकमजली घर, एका बाजूला गायी-गुरं बांधलेली ... मी क्षणभर आजोळी जाऊन येते. पण बहुदा मला पाण्याची ओढ असावी, कारण घोड नदीचं पात्रं मला जास्त आवडतं. शांत पाण्याशी एखादं जनावर पाणी पित असतं, आणि माझी पुन्हा तंद्री लागलेली असते. मधेच डाव्या बाजूला एक एकटाच डोंगर येतो. त्याच्यावरचा कातळ पाण्यामुळे अगदी घासून-पुसून स्वच्छ आहे. एकांडा शिलेदार आजूबाजूला पहारा देतो आहे, असं त्या डोंगराकडे बघून मला नेहेमी वाटतं. समोर दिसते एक पाटी 'महाळुंगे पडवळ <-- ६ किमी'. खरंतर या पाटीकडे लक्ष जाण्याचं काही कारण नाही, पण खाली आणखी एक ओळ आहे, 'हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मस्थान'. पुन्हा एकदा डोक्यात फिरंगोजी नरसाळा, राजगुरू, बाबू गेनू सगळा इतिहास आठवतो. या सगळ्या लोकांचे आपल्यावर किती उपकार आहेत आणि आपण मात्र देशासाठी काहीही करत नाही असा काहीसा त्रासदायक विचार डोकं पोखरायला लागतो.
आणि मग येते इवलीशी मिना नदी! खरंतर या नदीत आवडण्यासारखं काही नाही, पण नदीच्या जवळूनच जी.एम.आर.टी.चा सेंट्रल-स्क्वेअर दिसतो, आता जी.एम.आर.टी. आली याची कल्पना येते म्हणूनही असेल, मला मिना नदी आली की एकदम "हं आता जवळजवळ पोहोचलोच" हा सुखावह विचार येतो. कितीही जवळून ते अँटेनाज पहाता येत असले तरीही नारायणगावातून जे लँडस्केप दिसतं ते निराळंच. नारायणगडावरूनतर आणखी सुंदर देखावा दिसतो. हा सगळा विचार डोक्यात शिरून बाहेर पडेपर्यंत हाडं बाहेर येणार का काय असं वाटायला लागतं. पुणे-नाशिक रस्ता सोडून बस आता छोट्याशा खोडदच्या दिशेला लागली असते. मधेच एक गाव येतं भोरवाडी. खरं सांगायचं तर या गावात काही निराळं नाही, पण तिथलं एका कोपर्यावरचं देऊळ मला बाहेरुनच पाहिलेलं असलं तरी आवडतं. आधुनिक विटा-सिमेंट वापरून चिर्यांच्या बांधणीसारखं हे बांधलं, रंगवलं आहे. किती वेळा पाहिलं तरी पुढच्या वेळी मी पुन्हा डोकावून हे देऊळ पहातेच. एकदा तिथे सामुदायिक विवाह सोहळा रंगला होता, त्यामुळे बस ट्रॅफिकमधे अडकली. खरंतर ते गाव एवढंसं टिचभर, पण तिथेही गर्दी होती. एरवी ट्रॅफिक आणि गर्दीला वैतागणारी मी, त्या देवळाशेजारीच बस थांबली म्हणून जाम खूष झाले.
अचानक बसचा आवाज कमी होतो, बस थांबतेच आणि जी.एम.आर.टी.च्या प्रांगणात शिरते. मी एकदम लहान मुलीसारखी हरखून जाते, "आता ऑब्झर्व्हेशन्स! हुर्रे ... आणखी डेटा, आणखी काहीतरी इंटरेस्टींग काम .... "
मला जी.एम.आर.टी.त जायचा खरंच कंटाळा येतो. आत्ता तिथे बसले आहे, पण पुन्हा पुढच्या वेळेस इथे यायला लागेल याचा विचार करून आत्ताच कंटाळा आला. पण एकदा इथे आले की काहीतरी वेगळंच होतं. एक दिवस काम होत नाही, रुटीन बिघडतं म्हणून रुटीनप्रिय मी करवादते, पण इथल्या लोकांना भेटलं की वेगळंच काही वाटतं. जाऊन अगदी कॅंटीनमधले आचारी, वाढपी ते अगदी अॅडमिनीस्ट्रेशन-प्रमुखांशी गप्पा मारते. नुस्तं "काय, कसे आहात? मजेत ना??" एवढं विचारलं तरी हे सगळे चेहेरे किती सुंदर दिसतात. संध्याकाळी साडेपाचला परत यायला निघताना मी अगदी सहजच म्हणते, "मजा आली आज ... पुन्हा भेटू या. माझी ऑब्झर्व्हेशन्स कधीच संपणार नाहीत... तेव्हा सी यू लेटर!"
2 comments:
वा काय मस्त लिहितेस तू! फार आवडले. चंदनापुरीचा घाट माझाही फार आवडता आहे. फोटो टाक ना!
हा! तुमची प्रतिक्रिया मी आत्ता पाहिली! :-(
तेव्हा फोटो काढले नाहीत; गळ्यात कॅमेरा अडकवलेला असूनही चंदनापुरीच्या घाटातून जाताना खरंतर फोटो काढायचं सुचलंच नाही.
Post a Comment