Thursday, July 23, 2009

(शोध रेडीओचा, बोध 'जीवना'चा!)

नमस्कार वाचक,
(चाणाक्ष वाचकांना या विडंबनामागची प्रेरणा कळली असेलच.)

आपल्याला एखादं गाणं का आवडतं?

तीन साधारण उत्तरं - १) त्याचे शब्द आपल्याला आवडतात, २) त्याचं संगीत, त्याची चाल आपल्याला आवडते, ३) एकूण समष्टीने गाणं, गाणारा/री, गाण्याचं चित्रीकरण, गाण्यावर ओठ हलवणारा/री, वाद्यमेळ हे सगळंच आपलं डोकं हलवून जातं.

गाण्यांमधे बोली भाषेचा उपयोग मला नेहेमीच आवडत आला आहे. वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या उपमा, तोच तोच राग आणि त्याच त्याच सुरावटी वापरलेली गाणी रेडीओवर लागतच असतात आणि अचानक मधेच एकदम त्यासगळ्याच्या विपरीत एखादं गाणं लागतं. अचानक वाजवताना तंबोर्‍याची तार तुटावी तसं! क्षणभर वाटतं, "हे काय चाल्लंय?", तरीही गाणं पुढे सुरूच रहातं आणि एकदम टकाटक, २ जीबीची जादा मेमरी मिळाल्यावर हेवी प्रोग्रॅम जसा पळू लागतो तसं आपले विचारही पळत जातात... अगदी सुरांची आवर्तनं चालावीत तसेच!

शंकर-एहसान-लॉयचं निकल भी जा हे गाणं आपल्यापैकी फार लोकांनी ऐकलेलं नसेलच. आवर्जून ऐका. या गाण्यातून, त्याच्या चालीतून, त्याच्या मांडणीतून जावेद अख्तरसाहेबांनी शब्दांच्या माध्यमातून (प्रकटनाच्या शेवटी गाण्याचे बोल दिले आहेत) दिलेला व्यावहारीक जगण्याविषयीचा एक संदेश श्रोत्याच्या मनःपटलापुढे वेगवेगळ्या प्रसंगांना तंतोतंत उभा राहतो. गाण्यातील भावना थेट काळजापर्यंत पोचवणारी चाल, त्याला सुसंगत वाद्यमेळ आणि त्यात करण्यात आलेले प्रयोग या तिन्हींबाबत "क्या केहेने" हीच प्रतिक्रिया उमटू शकते. हे निकल जाणं पतली गलीतून आहे. अगदी चप्पल घालून तयार रहा असंच त्यातून सुचवलं जातं. अर्थातच, चालही त्याच मार्गानंच जाते. "निकल" मधली भावना आणि 'गली'तला ग किती शुद्ध आहे पहा. माझ्यामते या दोन शब्दांमुळे जावेदसाहेबांच्या गाण्यांची दिशाच पूर्ण बदलून जाते. 'निकल'मध्ये 'क'चा उच्चार करताना गायकानं क्षणभरासाठीच केलेला एक खेळ त्या निकलला हुकुमाचाच सूर लावून देतो. या निकल जाण्याचं नातं आधी म्हटल्याप्रमाणे पतली गलीतून आहे. त्यातही 'ग' किंचित आधीच थांबवत लीचा उच्चार दीर्घ करताना शंकरनं त्याच्या गळ्याची तयारी दाखवून दिली आहे. 'ग' वेळीच थांबला तरी त्याची बाधा होत नाही. पुढे यात असलेले सायकेडेलिक आणि इलेक्ट्रीक बीट्स एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.

(वरच्या या परिच्छेदाचं श्रेय एक ज्येष्ठ मित्र श्री. एसेम यांना)

दोन अंतर्‍यांमध्ये एक प्रयोग करण्यात आला आहे. या मधल्या टप्प्यात एका वेगळ्याच आवाजात धृवपद म्हटलं जातं. त्यासाठी जाणीवपूर्वक त्या मुलाचा आवाज किरटाच लागेल याची काळजी घेत गाण्याच्या संदेशाशी प्रामाणीकपणा राखण्याचा प्रयत्न संगीत संयोजकांनी केल्याचे दिसते. या मुलाने 'निकल भी जा'ला एक वेगळेच परिमाण गाठून दिले आहे. मधेच 'फटाफट' या कोरस आवाजाचा जो काही ध्यास घेतला आहे की आपल्यालाही तो आवाज अतिशय दैवी, डिव्हाईन वाटतो. (म्हणजे असं की आपल्याला कोणालाही तो काढता येणार नाही म्हणून दैवी.) स्वतः शंकर-एहसान-लॉयना देखील तो आवडला असावा कारण या संपूर्ण गाण्यात हा आवाज आपल्याला दोन ओळींसाठी ऐकता येतो.
या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची. मुख्य म्हणजे मुखड्यातच ते स्पष्ट होतं. पुढे मात्र "अरे बच्चमजा"वर सरकताना आधुनिक संगीत मुद्रण, ठेका आणि कोरसचा उपयोग एकदम लाजवाबच! दो और दो को बाईस बना, बेच अंगूर के भाव चना या दोन ओळी व्यक्तीशः जावेदसाहेबांच्या काव्यलेखनातला एक मानदंडच, पण त्याबरोबर शंकरने ज्या प्रकारे सूर-लयीचा खेळ केला आहे, अक्षय खन्नाने बोटांचा खेळ दाखवला आहे, चित्रपटाचं अर्ध नाव व्हीडीओत येतं तो अनुभव अंगावर काटे आणतो. अतिशयच उच्च. 'खुल के मुस्कराले', 'मितवा', 'मां' अशा गाण्यांबरोबरच 'कजरा रे', 'हे बेबी', आणि आताचं 'पतली गली' अशी काही कंटेंपररी गाणी ही शंकर-एहसान-लॉय यांची खासियतच. तुम्हा-आम्हाला अगदी आपले वाटणारे, "अरे", "अबे" असे शब्द सहज (सदस्य क्र. ८ नव्हे) गाण्यात वापरणे ही तर शंकरच्या सर्वसामान्य तरीही लवचिक आवाजाची जादू; आणि अशा लयीच्या गाण्यावर अतिशय उच्च नाच हे फक्त अर्शद-अक्षयच करू जाणे!

आपल्याला आवडलेलं आहे का नाही हे सुद्धा समजत नाही अशा एखाद्या गाण्यातील एखाद्या ओळीचा, एखाद्या बीट्सचा अभ्यास करताना, त्यात असलेल्या(!) गूढ अर्थाचा शोध घेताना, मागोवा घेताना खरंच खूप आनंद होतो हेच खरं!

'जीवना'चा बोध! कधीच अनमोल न वाटणारा तरीही ठेवा. मम विडंबनाची ठेव...!

गाण्याचे बोल:
निकल भी जा निकल भी जा पतली गली से निकल भी जा
सही है क्या गलत है क्या सोच के अपना दिल ना जला
अरे बच्चम जा ले ले शॉर्टकट अरे यही अच्छा ले ले शॉर्टकट
अरे सुन बच्चा चल दे तू फटाफट
अरे कर नही गम, ले ले शॉर्टकट, ओये टाईम है कम, ले ले शॉर्टकट
है तुझ को कसम चल दे तू फटाफट॥

दो और दो को बाईस बना बेच अंगूर के भाव चना
फायदा तेरा जो कर सके, उस को लगा मस्का उस को मना
अरे बन चमचा, ले ले शॉर्टकट, अरे यही अच्छा ले ले शॉर्टकट ... ॥

सिधा चलेगा तो गिर जायेगा टेढा चल राह जो टेढी मिले
सब से उपर जाना तो उपर जाना है तो
चढ जहा भी सिढी मिले
कभी ऐसा ले ले शॉर्टकट, अरे कभी वैसा ले ले शॉर्टकट
अरे दे पैसा चल दे तू फटाफट ... ॥

Friday, July 10, 2009

तुमचा खेळ होतो आणि आमचा ... (भाग एक)

निलेश, असाच एक सॉफ्टवेअर इंजिनियर, एका प्रथितयश सॉफ्टवेअर कंपनीमधे नुकताच नोकरीला लागला होता. इंजिनीयरींग कॉलेजमधे नेहेमीच पहिल्या तीनात आल्यावर नोकरी मिळवण्यासाठी फार काही कष्ट करावे लागलेच नाहीत. परिक्षेतल्या मार्कांसाठी अभ्यास करता येत असला तरी वर्षातले परीक्षा, सबमिशन असे तीन-चार महिने सोडले तर हा कायम काही ना काही 'प्रोजेक्ट्स' करत रहायचा! आई मात्र "पोरगा का कायम कंप्यूटरला चिकटून बसलेला असतो" या चिंतेत असायची. घरी मित्रमंडळ आलं तरी चर्चा कायम अगम्य भाषेतच! आईला त्यांची भाषा इंग्लिश, मराठी किंवा हिंदी आहे ते समजायचं पण काय बोलायचे ते कधीच तिच्या पचनी पडलं नाही. पण पोरगं कधी वाईट नादाला लागणार नाही याची खात्री होती आणि परीक्षेतल्या मार्कांवरून त्याची पावतीही तिला मिळायची त्यामुळे तिने कधीच फार चौकशी केली नाही. घरात आणि नातेवाईकांमधे शांत असणारा निलेश, त्याचं मित्रमंडळ आला की मात्र पार बदलून जायचा. उत्साहात काहीतरी चर्चा घडत, दोन मित्र, श्रीराम आणि हृषि, कधीमधी रात्री घरी थांबत आणि आईशीही मस्त गप्पा मारत, एकीकडे काहीबाही कामही सुरू असायचं. त्यांच्या कामातलं काही समजत नसलं तरी पोरांसाठी रात्री कॉफी बनवून देताना, त्यांना रात्री दोन वाजताही काही खायला बनवून देताना आईलाही मनापासून समाधान मिळत असे. आणि एका रात्री निलेशने आईला उठवलं, कंप्यूटरवर तिघांनी मिळून पृथ्वीवरचे ऋतू, चंद्र-सूर्याची ग्रहणं, पृथ्वीची परांचन गती समजावून सांगणारं सिम्युलेशन तयार केलं होतं. पोरांचं रात्री उशीरा जागून काय चालायचं हे आता मात्र आईला व्यवस्थित समजलं.

निलेशला ज्या कंपनीत नोकरी लागली तिथेच श्रीरामलाही मिळाली. पण त्याने आणि हृषीने एकत्र धंदा सुरू करायचं ठरवलं, आय.टी.संदर्भातलाच. निलेशच्या घरची आर्थिक परिस्थिती त्याच्या वडिलांच्या पाठून थोडी खराब झाली होती त्यामुळे त्याने एकीकडे नोकरी सुरू करत दुसरीकडे मित्रांना लागेल तशी मदत करायचं ठरवलं. नव्या नोकरीत रूळायला निलेशला अजिबातच वेळ लागला नाही. ज्या लोकांनी लिहिलेली पुस्तकं तो अभ्यासक्रमात वाचत होता तीच माणसं आता त्या कंपनीत त्याचे सिनीयर्स, बॉस म्हणून नोकरीला होती. मनासारखं काम करायला मिळत होतं, चर्चा करायला एकापेक्षा एक हुशार माणसं आजूबाजूला होती, अननुभवी मुलासाठी पगारही चांगला होता, शिवाय शनिवार-रविवार हृषी आणि श्रीरामबरोबरही काम सुरू होतं. हल्ली आई मागे लागल्यामुळे तो रोज सकाळी उठून ऑफिसच्या जिममधेही जात होता.
आणि हो, ऑफिसमधेच निलेशच्याच मागोमाग एक मुलगी जॉइन झाली होती. कुठल्या डिपार्टमेंटला होती, तिचं नाव काय, निलेशला माहित नव्हतं. पण तीसुद्धा रोज सकाळी याच्याच वेळेला जिममधे असायची. तीही एकटीच असायची आणि हा पण, हळूहळू दोघांना एकमेकांची नावंतरी समजली. काही दिवसातच त्याला समजलं की नंदिनी सायकोलॉजिस्ट आहे आणि ट्रेनी म्हणून ती सध्या त्याच्याच कंपनीत लागली आहे. अतिकामाच्या ताणामुळे कर्मचार्‍यांना होणारे मानसिक आजार टाळण्यासाठी चांगल्या कंपन्या सायकोलॉजिस्टनाही कामावर ठेवतात. पण निलेशचा एक प्रॉब्लेमच होता, सख्खी किंवा जवळची बहिण नसल्यामुळे आणि आजपर्यंत कधी मैत्रिणी नसल्यामुळे मुलींशी नक्की काय बोलायचं हे याला माहितच नव्हतं. तो कायमच तिला तिच्या कामाबद्दल, सायकोलॉजीबद्दल प्रश्न विचारत असे आणि ती पण त्याला प्रश्नांची उत्तरं देत असे. तिच्या कामाच्या स्वरुपामुळे तिला याच्याबद्दल माहिती सरळच कळली आणि एवढ्या हुशार आणि सरळ मुलाशी आपल्याला इतक्या सहजच बोलता येत आहे याची तिलाही गंमत वाटत होती. चांगलं आयुष्य यापेक्षा वेगळं असूच शकत नाही यावर त्याचा ठाम विश्वास बसला होता.

पण मंदीचा फेरा कुणासाठीही थांबणार्‍यातला नव्हता. खर्चात कपात निलेशच्या कंपनीतही सुरू झाली होती. प्लास्टीकच्या वापरून फेकून देणाच्या कपांच्या जागी खरे, चिनीमातीचे कप आले होते. ऑफिसमधे कामाचे तास निश्चित केले होतेच, पण त्यापेक्षा जास्त वेळ थांबायला मनाई होती. शिवाय कामाच्या तासांमधे काय काय काम केलं हे दर शुक्रवारी लिहून द्यायला लागत होतं. चांगली गोष्ट एवढीच होती की काम मात्र खूपच रोचक होतं, डोक्याला चालना देणारं होतं. आणि ही नोकरी सोडायची तर पैशांची दुसरी सोयही होत नव्हती. नुकताच बाळसं धरू लागणारा श्रीराम आणि हृषीचा धंदाही जरा खंगल्यागत होत होता. त्या दोघांच्या पोटापाण्याची चिंता नव्हती एवढंच! आता मात्र या त्रिकूटाला पुन्हा आपले कॉलेजचे दिवस आठवू लागले. पुन्हा काहीतरी नवं प्रोजेक्ट मजेखातर करावं, त्यातून पैसे मिळाले तर ठीक नाहीतर अनुभवतरी मिळेल, असं त्यांच्या डोक्यात येऊ लागलं.

निलेशच्या कंपनीत मोबाईल्ससाठी गेम्स बनवत असत. श्रीराम आणि हृषी त्यावरून कायमच त्याची फिरकी घेत, पण या गेम्सच्या क्षेत्रात पैसा चिक्कार आहे आणि तेवढंच आव्हानात्मक काम करता येईल याची त्या तिघांना खात्री होती. कंपनीच्या पॉलिसीजमुळे काय प्रकारच्या गेमवर काम सुरू आहे हे सांगता येत नव्हतं, पण काय प्रकारचा गेम बनवावा हे या तिघांच्या डोक्यात येतही नव्हतं. जोपर्यंत चांगली कल्पना येत नाही आहे तोपर्यंत काही काम सुरू करता येत नव्हतं. पुन्हा एका शनिवारच्या पावसाळी रात्री तिघे जण निलेशच्या घरी बसले होते. गंमतीत एक फेरी मारून आल्यावर तिघेही भिजले. कपडे बदलून आल्यावर मग कॉफीची लहर आली. "काकूला उठवण्याऐवजी आज मीच कॉफी बनवतो", हृषी उठला. थोडं दूध आणि थोडी साखर 'ओटा'तीर्थी पडल्यावर कॉफी कपांमधे आली. गरमगरम कॉफी पोटात गेल्यावर मात्र तिघांनी झोपायचं ठरवलं. टी-पॉयवर तसेच कॉफीचे कप, सारखेचे दाणे, टाकून तिघंही डाराडूर झोपले आणि सकाळी आईने पोहे फोडाणीला टाकल्यावरच हाक मारली. आळोखेपिळोखे देत असताना श्रीरामला कालच्या टीपॉयवर माशा दिसल्या. त्याने हातात 'टाईम्स' घेऊन माशांवर एक हल्ला चढवला. माशी उडून गेली. मग निलेशला 'सकाळ' दिसला, आणि एक टार्गेट माशीही सापडली. इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि माशी उडून गेली. हृषी मात्र या कडे टक लावून पहात होता. "ए हृष्या, उठ की आता जागा हो जरा, किती वेळ असा मंदसारखा बघत रहाणार आहेस?"

हृषीने शांतपणे आपलं निरीक्षण सुरूच ठेवलं आणि हळूच म्हणाला, "सध्या सुरूवातीला हाच खेळ कंप्यूटरसाठी लिहिला तर?"

गोष्टीसाठी काही सत्य घटना, काही चित्रपटांच्या कथांचा काही भाग आणि माझी कल्पना यांची मिसळ केली आहे. याउप्पर कोणत्याही प्रकारचं प्रकाशित साहित्य कच्चा माल म्हणून वापरल्याचं लेखिकेच्या आठवणीत नाही.

पुढचा भाग पुढची सी.एल. घेईन तेव्हा!

Followers