Wednesday, January 26, 2011

असेही काही प्रवास.

"सह्ही, विमानाने जायचं तिकडे" इथपासून माझी उत्क्रांती "त्या अ‍ॅल्युमिनीयमच्या नळकांड्यात बसायचा मला भयंकर कंटाळा येतो" इथवर झाली. एकटीने विमान प्रवास करून झाला, सोबतीला पुस्तकं, विमानातली करमणूकीची साधनं, कधी सहप्रवाश्यांशी गप्पा असं करून फारतर अर्धा दिवस प्रवास करून इकडून तिकडे लवकरात लवकर पोहोचणे हे साध्य अनेकदा मिळवून झालं. भारतातून युरोपातला प्रवास फार्फार कंटाळवाणाच असायचा असं नाही, पण भारतातून निघताना बॉयफ्रेंडला सोडून जायचं म्हणून दु:ख असायचं आणि भारतात परत येताना एका घरातून दुसर्‍या घरात जाताना मधली गैरसोय नको असायची. शिवाय विमानात काही महान कॅरॅक्टर्स भेटायची, पण असे प्राणी समोर असताना कधीच विनोदी वाटले नाहीत. घरी पोहोचल्यावर गप्पा मारताना या प्राण्यांचे किस्से सांगताना मज्जा यायची हा भाग निराळा.

असंच एकदा ख्रिसमसच्या सुट्टीत मँचेस्टरहून मुंबैला निघाले होते. ऑमश्टरडॉमला (हा माझा डच उच्चार अ‍ॅमस्टरडॅमचा!) विमान बदललं. भारतीय लोकांची भरभरून सामानं नेण्याची सवय, त्यामुळे आपला लॅपटॉप आपल्या पायासमोर ठेवून झोपेचं खोबरं होईल याची भीती अशा सगळ्यामुळे मी नेहेमीप्रमाणे घाई करून लवकरच विमानात चढले. माझ्या थोड्या मागूनच एक साडी, कुंकू शेजारी येऊन बसलं. मला रेल्वेने जाताना रस्ता दिसला, विमानातून जाताना ट्रेन किंवा ट्रॅफिक जॅम दिसलं, बसमधून विमान दिसलं की भयंकर आनंद होतो. पण एकूण साडी-कुंकवाचे भाव पाहून समस्त गोर्‍या गर्दीत साडी-कुंकवाचा आनंद झाला नाही. नेमकं कुंकू अगदी जवळ उभं राहिलं तेव्हा मी हात सैलावून आळस देत "आई गं" म्हटलं आणि साडी-कुंकू एकदम मराठीतच गप्पा मारायला लागलं. दोनच मिनीटांत काकू नाशिकच्या आहेत, (अमेरिकेत हो!) मेंफिसला एक मुलगी 'दिलेली' आहे, ही माहिती मिळाली; 'हिरवा माज' जी संज्ञा तेव्हा माहित नव्हती तरी आपली मुलगी अमेरिकेत असल्याचा रंगांधळा माज दिसलाच. काकूंनी लगेच माझीही माहिती काढून घेतली. मी पीएच्.डी. करते आहे हे ऐकल्यावरतर आपली मुलगीही कशी पीएच्.डी. करणार होती, पण चांगलं स्थळ आलं म्हणून तो विचार सोडून दिला, असं सांगून "हं, तुमच्यासारख्या पीएच्ड्या कोपर्‍याकोपर्‍या मिळतात" असं दाखवत, मी मनातल्या मनात त्यांचा उल्लेख साडी-कुंकू केल्याचा बदला घेतला. पण थोड्याच वेळात हा माजुरडा 'हरी' अडल्यामुळे म्या गाढवाचे पाय धरणार होता हे दोघींनाही माहित नव्हतं.

विमान सुटायच्या आधीच काकूंनी आपला रिलायन्सचा मोबाईल मला दाखवून पुन्हा एकदा शाईन मारली. रेडीओ अ‍ॅस्ट्रॉनॉमर मालकिणीच्या भीतीमुळे माझा फोन पाच तास आधीच गजर म्हणून आपली ड्यूटी करून झोपला होता. पण हाय रे कर्मा, काकूंना टावर नव्हता. मी (उगाच) औदार्य दाखवून, माझा फोन सुरू केला आणि काकूंच्या नाशकातल्या मुलांना एसेमेस केला आणि फोनला पुन्हा झोपवला. थोड्याच वेळात आमचं विमान शब्दार्थाने हवेत गेलं आणि मग ट्रॉल्या विमानात खडखडायला लागल्या. आमच्या दोनच ओळी पुढून पेयपान द्यायला सुरूवात झाली. बालपण आणि म्हातारपण एकसारखंच, याचा एक अनुभव लगेच मला आला. काकूंनी पाच मिनीटांचीही प्रतिक्षा न करता आधीच केबिन-क्रूला हाक मारून ऑरेंज ज्यूस मागवायचं ठरवलं. आलेली बाई अमेरिकन होती, तिने तिला झेपेल तेवढ्याच नम्रपणे काकूंना काय हवंय ते विचारलं. काकूंनी लगेच त्यांच्या फर्ड्या तर्खडकरी (!) इंग्रजीत आपल्याला ऑरेंज ज्यूस हवं आहे असं फर्मान सोडलं. अमेरिकन बाई आणि नाशिकची काकू यांच्यात बराच वेळ चर्चा झाली, जी मला थोड्या वेळाने असह्य झाली. मी आपलं जमेल तशा इंग्लिशमधे अमेरिकन मडमेला काकूंची विनंती कळवली आणि तिनेही अमेरिकनमधे 'अच्छा असं आहे होय' म्हणत 'हां, आम्ही येतोच आहोत सगळ्यांना पेय्यपान देत' असं म्हणत पतली गली पकडली. "असा मी असामी"मधला शंकर्‍या परवडला पण काकू नको अशी अवस्था व्हायला ही तर फक्त सुरूवातच झाली होती.

पेय्यपान झालं, खानपान झालं आणि पुन्हा चहा-कॉफी फिरायला लागली. काकूंनी पुन्हा एक ऑरेंज घेतलं. मी तोपर्यंत थोडीबहुत युरोपाळलेली असल्यामुळे कॉफी घेतली. इंग्रज लोकांना कॉफी बिल्कुल बनवता येत नाही याचा पुरावा मिळाला, पण चांगल्या अर्थी. अमेरिकन विमानात कॉफीमात्र लै भारी होती. अगदी पहिला घोट तोंडात गेल्यागेल्याच मी "वाह, काय कॉफी आहे" असं अगदी अभावितपणे म्हटलं. ही पुढल्या "संकटाची" नांदी होती. "हो का? कॉफी खूप चांगली आहे का?", हातातला ऑरेंज ज्यूसचा ग्लास रिकामा करत काकू किणकिणल्या. लगेचच हातातलं केक्रूला बोलावण्याचं बटण दाबून काकू मोकळ्या. पुन्हा तीच अमेरिकन आजी आली. पुन्हा तेच इंडियन आणि अमेरिकन इंग्रजी भिडलं आणि मला असह्य झाल्यानंतर पुन्हा एक इंग्लिश-टू-इंग्लिश भाषांतराचा क्षीण प्रयत्न मी केला. थोडक्यात काकूंना कॉफी हवी होती आणि माझी कॉफी संपायच्या आत ती आलीही. पहिलाच घोट काकूंनी घेतला, "शी! ही काय कॉफी आहे काय? कॉफी कशी, एकदम लाईट, गोड आणि छान जायफळ आणि दूध घालून केलेली असली पाहिजे." बेशुद्ध पडल्यामुळे मीच माझी चप्पल तोंडात मारून घेतली. पण थोड्याच वेळात ती कॉफी बेकार असल्याचा अनुभव आला, काकू झोपल्या आणि अघोर सप्तकात त्यांनी घोरायला सुरूवात केली. मी अधूनमधून पुस्तक, डुलक्या आणि 'नमस्ते लंडन' का कायसासा पिक्चर पहात वेळ काढला. काकूंना जाग आली तेव्हा आमचं विमान साधारण तेहेरानच्या वरून उडत होतं. "मुलाकडून त्या एसेमेसचं उत्तर आलंय का पहा बघू?" काकू विमान मुंबईला पोहोचल्याच्या आनंदात का होत्या मला कळलं नाही. पण मला पडलेला हा प्रश्नच चुकीचा होता. "काकू, आत्ता कसं पहाणार? मुंबैला पोहोचायला खूप वेळ आहे अजून." कम्युनिकेशन ब्रेकडाऊनचा पुरेपूर अनुभव मी घेत होते. "अगं पण त्याचा एसेमेस आला नसेल तर त्याला पुन्हा फोन करता येईल ना, मुलगा आत्ताच निघाला तर वेळेत पोहोचेल ना मुंबईला." काकूंचं विमान हवेत होतं का विमान हवेत गेल्यानंतर काय शिस्त असते हे काकूंना माहित नव्हतं हे मला अजूनपर्यंत समजलेलं नाही. खुद के साथ बातां: थेरडे, तू मरायला तयार झाली असलीस तरी मी अजून गोवर्‍या नाही मोजायला घेतलेल्या! पण हे मनातच ठेवून, शक्य तेवढं हसू तोंडावर आणत "काकू, विमानात नाही हो फोन लावता येत." काकूंना माझी कांकू का सुरू आहे हे समजत नव्हतं. "पण मी उठते की, मग तुला उठून लावता येईल फोन." माझा फोन वरच्या हेडलॉकरमधे आहे म्हणून मी नाही म्हणते आहे या समजूतीत काकू होत्या, हे मला तेव्हा कळलं. "नाही हो, तसं नाही. विमानात मोबाईल वापरायला बंदी असते.", आता मात्र मी त्यांच्या अज्ञानाचा पुरेपूर फायदा उठवायचं ठरवलं. "मी इथे फोन सुरू केला आणि त्यामुळे विमान बदकन खाली पडलं तर?" मग हा आग्रह झाला नाही.

अजून थोडा वेळ थोडा शांत गेला आणि मला खिडकीतून बाहेर भास होताहेत असं वाटलं. आधी वाटलं पंखावरच्या दिव्याचा प्रकाश ढगांवरून (उनिकोदात केल्यासारखा) परावर्तित होतो आहे. पण नंतरमात्र फार वेळ न घेता ट्यूब पेटली, बाहेर वीजा चमकत होत्या. विमानाच्या प्रवासमार्गाकडे नजर टाकली तर वैमानिकाने थोडा लांबचा रस्ता घेतला आहे आणि पोहोचायला थोडा उशीर होईल हे पण कळलं. हातात कॅमेरा होता, पण फार चांगले फोटो आले नाहीत. पण वीजांच्या उंचीवरूनच त्यांच्याकडे पहाण्यात फार जास्त गंमत नाही आली, एक वेगळा अनुभव एवढंच. विजा थोड्या मागे पडल्यावर वैमानिकाने मार्ग थोडा बदलायला लागला आणि अर्धा तास उशीर होईल असं जाहिर केलं. काकूंना अर्थातच इंग्लिश समजत नसल्यामुळे "अर्थातच" भाषांतराची जबाबदारी माझ्यावर पडली. सांगितल्यावर "का? जायचं ना विजांमधून? आपलं विमानतर एवढं मोठं आहे की!" हे ऐकल्यानंतर काय झालं हे मला नीटसं आठवत नाही. एकतर मी बेशुद्ध पडले असणार किंवा मी सरळ दुर्लक्ष केलं असणार, पण त्यानंतरमात्र मी विमानातून उतरेपर्यंत मुकीबहिरी असण्याची भूमिका वठवत होते; कोण या वठल्या खोडाशी पंगा घेणार?

हा सगळा अनुभव काही वर्षांपूर्वीचा. आता मी थोडी मोठी झाले आहे (असं आपलं म्हणायचं म्हणून म्हणायचं)! काहीही का असेना, अशी विसंवादी पात्र दिसली की फारवेळ राग रहात नाही, मला या सगळ्याची गंमत वाटायला लागते. "येवढा लांब प्रवास, नको, कंटाळा आला" इथपासून "ठीक आहे, चोवीसच तास लागतात अमेरिकेतून भारतात पोहोचायला!" इथवर आता उत्क्रांती झाली आहे. आजूबाजूच्या अनेक गोष्टींची मौज वाटण्यामुळेही हे शक्य असेल. अलिकडेच ऑस्टीनहून मुंबईला आले तेव्हा या सगळ्याची हद्दच झाली. दोन ठिकाणी विमानं बदलून यायला लागलं आणि तिन्ही विमानं अगदी स्पेश्शल होती. पहिलं होतं ऑस्टीन ते ह्यूस्टन, अगदीच छोटा प्रवास आणि विमानही तसंच लहान! अगदी माझी वामनमूर्ती प्रवासाच्या शेवटी उठून उभी राहिल्यावर डोकं आपटावं एवढं छोटं विमान होतं. ओघळलेल्या, कुरूप जाड्या लोकांच्या अमेरिकेत असलं विमान बनवलं, चालतं याची मला मजा वाटली. गरीबांचं दुकान म्हणून प्रसिद्ध असणार्‍या वॉलमार्टात दिसणारी ओथंबलेली जाडी माणसं या विमानातून जायला लागली तर काय दंगा होईल ना असा "दुष्ट" विचार माझ्या डोक्यात डोकावून गेलाच. ह्यूस्टन विमानतळावर उतरायच्या अगदी थोडं आधी मला दुसरं एक विमान धावपट्टीवर उतरताना दिसलं हा अनुभवही मस्तच होता. पुढचा टप्पा होता पॅरीसपर्यंत. जानेवारीचा मध्य उलटून गेलेला, बुधवार, अशा दिवशी विमानात किती कमी गर्दी असू शकते याची कल्पना मला आधी आलीच नाही. वेळेच्या बरीच आधी मी गेटवर जाऊन बसले होते. आता गर्दी वाढेल, नंतर वाढेल असा विचार करेपर्यंत विमानात चढायची वेळही झाली. लहान मुलं बरोबर असणारी कुटुंब, व्हीलचेअरची गरज असणारे लोकं विमानात गेलेही. आणि सूचना झाली, आता इतर सगळ्यांनी विमानात चढा. माझ्यासकट अनेकांना कळलंच नाही, "म्हणजे एवढे सगळे एकत्र गेले तर गर्दी नाही का होणार?" अजिबात गर्दी झाली नाही, विमान पंचवीस टक्केच भरलं असेल जेमतेम, कुठून होणार गर्दी? माझी जागा खिडकीत होती, आणि शेजारी कोणीच नाही. तंगड्या पसरून विमानात बसायला मिळण्यात किती सुख असतं हे काय सांगणार? पण सुख टोचतं म्हणतात, एवढी जागा असून मी आख्खा प्रवासभर जागीच होते. हरकत नाही, पॅरीस-मुंबै असा आठ तासांचा प्रवास बाकी होता आणि त्यासाठी फार वेळ विमानतळावर थांबायला लागणार नव्हतं.

पुन्हा एकदा सगळे सोपस्कार करून मुंबैला जाणार्‍या विमानाच्या रांगेत मी उभी राहिले. लॅपटॉप ठेवायला वरच्या लॉकरमधेच जागा मिळाली, माझी खिडकीची सिट मिळाली, आता मस्त ताणून देऊ या म्हणून विमानाचे दरवाजे बंद करायच्या आधीच मी थोडी सैलावले तर कोणीतरी जोरजोरात बोलत आहे, हसत आहे असं ऐकायला आलं. मला आधी वाटलं की इथे आख्खा ग्रूप आलाय का काय तामिळ लोकांचा, म्हणून पाहिलं तर एक पोट्या, मध्यमवयीन, मुछ्छड आपल्याकडे मोबाईल असल्याची क्षीण, छे छे, साऊथ इंडीयन पिक्चर्सप्रमाणे लाऊड जाहिरात करत होता. त्याला त्याचं भलंथोरलं सामान वर ठेवायला जागा नव्हती म्हणून का काय आख्ख्या विमानभर फिरून त्याने सगळ्यांना तामिळमधून गडगडाटी हसूनही दाखवलं. इंग्लिशमधे obnoxious कशाला म्हणतात असं विचारलं तर मी नक्कीच त्याच्याकडे बोट दाखवलं असतं. आता हे कमी होतं का काय, हा mustachio माझ्याच शेजारी, एक सीट सोडून बसला. बाप रे, आता हा लाऊड माणूस सहन करायचा? झोपमोडतर झालीच होती. मी आधी नक्कीच वैतागले होते. विमान हवेत गेलं, समोरच्या टीव्हीवरचे कार्यक्रम सुरू झाले आणि हे भाई एकदम टाळ्या-बिळ्या वाजवायला लागले. एकदा झालं, दोनदा झालं आणि माझा राग थोडाही निवळला होता. मला भयंकर उत्सुकता होती, हा माणूस काय पहातोय काय? मला पण पहायचा आहे तोच कार्यक्रम! 'दबंग' एकदा पाहून झाला होताच. म्हणून डोकावून पाहिलं तर कळलं पर्‍याची आणि याची आवड एकच होती. ट्वायलाईट-एक्लिप्स पहात हा भाई हिरविणीचा क्लोजअप आला की टाळ्या मारत होता. हा मात्र कहर होता (अशी माझी तेव्हा समजूत झाली). थोडा वेळ पाहू या आणि नाहीच बंद झालं तर सांगू या, असा विचार करून मी पुन्हा एकदा मुन्नीची बदनामी पहायला लागले. थोड्याच वेळात जेवण आलं, आणि शेजारच्या अण्णाने दोन बाटल्या वाईन मागून घेतली. आता मात्र माझा मांजर स्वभाव पुरता जागृत झाला. याने आपला ट्रे बाहेर काढला, एअर होस्टेसने आधी एक बाटली दिली, ती याचं जेवण ट्रेवर ठेवते तोपर्यंत बाटलीतले एक-दोन घोट कमी झाले होते. याने आणखी एक बाटली मागून घेतली आणि नंतर आठवण झाल्याप्रमाणे ग्लास मागितला. बाटलीच तोंडाला लावून वाईन पिण्याचा प्रकार पाहून माझ्या रक्तवारूणीप्रेमी मनाला मणमण यातना झाल्या. पण या यातना फार काळ टिकणार नव्हत्या. अण्णाने चटचट खाणं आणि पिणंही आटपलं आणि अगदी पापणी लवतेय असं वाटावं एवढ्या वेळात झोपला. नुस्ताच झोपला नाही तर अगदी, एकदम पक्का डावा होऊन झोपला. "छ्या, करमणूकीसाठी आता पुन्हा सलमान खानला पहावं लागणार" असा विचार करून मी पुन्हा 'दबंग' लावेपर्यंत खाण्याचे ट्रे गोळा करायला केक्रू आलाच. आता या अण्णाचं डावे 'आचार' विमानाच्या येण्याजाण्याच्या रस्त्यामधेच आल्यामुळे केक्रूने त्याला बाजूला होण्याची विनंती केली. हा झोपला आहे असा विचार करून त्या भल्या बाईने त्याला सरळ करायचा प्रयन्त केला तर डावेभाई एकदम उजवेच झाले. मध्यमवय असलं तरी मध्यममार्गाचं त्याला वावडं असावं. मला या सगळ्याच प्रकाराची गंमत वाटत होती. आतली प्रेरणा, हवेतला टर्ब्युलंस अशी बाहेरची संप्रेरकं, आणि लोकांचं जाणंयेणं यामुळे अण्णाला आपण डावे आहोत का उजवे हे धड समजत नसावं.

विमानात मला खूप तहान लागते. म्हणून विमानात चढायच्या आधी, जेवताना असं मिळून मी लिटरभर पाणी रिचवलं होतं, ते थोड्या वेळाने आतून हाका मारायला लागलं. आता आली ना पंचाईत! सेतू बांधून रामाने म्हणे पाल्कची सामुद्रधुनी ओलांडली पण कलियुगातल्या या विमानात मी चढलेल्या माणसाला कुठे चढून ओलांडायचं हे मला समजेना. केक्रूला बोलावून माझी अडचण सांगितल्यावर त्यांच्याकडे उत्तर तयारच असावं. तिने जाऊन दुसरीलाही बोलावलं. मला सीटवर उभं करून या दोघींनी माझे हात पकडले. दोन्ही हात पसरून दोघींनी पकडलेले आणि मी सीटवर उभी यामुळे मी एकदम येशुख्रिस्त दिसत असणार या विचाराने मला हसूच आलं, पण पोटातलं पाणी फारच हाका मारत होतं. मग क्षणार्धात येशूची सुपरमॅन होऊन मी चालत्या विमानात सूर मारून अण्णाची लक्ष्मणरेषा ओलांडली. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे काय असतं याची मला तेव्हा चांगलीच कल्पना आली. म्हणजे बोलायला ठीक आहे हो, मी मुक्त स्त्री आहे वगैरे! पण प्रत्यक्षात मुक्तीची वेळ आली तेव्हा या दोन इतर मुक्त स्त्रियांचं सहकार्य मागावं लागलंच की! थोडा वेळ बाहेरच उभी राहिल्यावर पुन्हा जागेवर जाऊन बसावं असा विचार केला आणि आता मात्र माझ्या अंगात स्पायडरमन संचारल्याच्या थाटात मी एकटीच दोन शिटांच्या हँडरेस्टचा वापर करून जागेवर आले. या सगळ्या 'क्लायमिंग'च्या प्रकारात अण्णाची थोडी उतरली असावी असं मला वाटलं. कारण आता त्याने पवित्रा बदलला, पसरलेले पाय आवरले आणि समोरच्या सीटपॉकेटमधे खुपसले. माझ्याकडे खिशात ठेवण्याएवढा छोटा कॅमेरा नाही याचं दु:ख मला अनेकदा होतं, त्यातलाच हा एक प्रसंग! 'टॉम अँड जेरी'ची डायहार्ड फॅन असल्यामुळे मी लगेच ते सीट पॉकेट फाटायला लागलं तर काय होईल, किंवा समोरची सीटच खाली यायला लागली तर काय होईल असे सगळे विचार मनातल्या मनात करून झाले. आतापर्यंत विमान भारताच्या हद्दीत आलेलं होतं. लँडींगच्या सूचना होत होत्या. केक्रू प्रत्येकाचे सीट बेल्ट्स पहात होते. अण्णाला इतर काही शुद्ध नव्हतीच तर सीटबेल्टची पर्वातरी त्याने का करावी? त्या भल्या बाईने याचा सीट बेल्ट लावेपर्यंत अण्णा बराच जमिनीवर आला होता. विमान जमिनीवर आल्यानंतर काही मला उड्या माराव्या लागल्या नाहीत. मुंबई विमानतळावर सामानाची वाट पहात असतानाच एकाने जवळ येऊन "तुला सीटवरून उडी मारताना भीती वाटली नाही का" असं विचारलंच. मुक्ती आणि स्वातंत्र्यासमोर या असल्या गोष्टींची भीती वाटत नाही असा ड्वायलाक डोळा मारतच मी मारल्यावर माफक हशा पिकला.

"चला पोहोचले एकदाची" असा विचार येतोच आहे तेवढ्यात आठवलं, फेब्रुवारी आणि मार्चमधे एकेक कॉन्फरन्सेस आहेत आणि ट्रेनने पुण्याहून तिथे पोहोचायला आख्खा एक दिवस लागेल. त्यामुळे बहुदा पुन्हा वाढलेल्या पगाराचा माज विमानप्रवासातून दाखवून होईलच. नाही, आणखी एक लंबंचवडं ब्लॉगपोस्ट टाकण्याची ही धमकी नाही.

Followers